CoronaVirus News: नागरिकांनो, तुम्ही थांबणार आहात ना घरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:14 IST2020-08-09T00:14:39+5:302020-08-09T00:14:48+5:30
कल्याणच्या युवा रंगकर्मींची शॉर्ट फिल्ममधून जनजागृती : गांभीर्य ओळखून खबरदारीचा संदेश

CoronaVirus News: नागरिकांनो, तुम्ही थांबणार आहात ना घरी?
ठाणे : राज्यात सर्वत्र हळूहळू अनलॉक होत असले, तरी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन वारंवार प्रशासनातर्फे केले जात आहे. याच खबरदारीचा संदेश देणारा ‘तुम्ही थांबणार आहात ना घरी?’ हा लघुपट कल्याणचे युवा रंगकर्मी संकेत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केला आहे.
आता अनेक कार्यालये, दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे काहींना कामानिमित्त घराबाहेर पडणे आवश्यक आहे. परंतु, काही जण कामाव्यतिरिक्त विनाकारण घराबाहेर पडत आहेत. एखाद्या छोट्या किंवा किरकोळ कामासाठी एकाचवेळी घरातले दोन-तीनजण बाहेर जातात. अशांनाच या शॉर्ट फिल्ममधून संदेश देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. शहरे हळूहळू अनलॉक होत असली, तरी कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतील रुग्णसंख्या वाढतेच आहे. तरीही, लोकांना त्याचे गांभीर्य दिसत नाही. रुग्णसंख्या वाढल्याने काही सार्वजनिक मैदाने, मोकळ्या जागा, जिमखाने येथेही कोविड सेंटर उभे राहिले आहेत. लोक ांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे आणि शक्य तितके घरातच राहावे. कोरोनापासून स्वत:ला आणि कुटुंबाला दूर ठेवावे. कामाव्यतिरिक्त भेटणे टाळले पाहिजे. स्वत:ला काही शिस्त लावून घेतली पाहिजे. ही खबरदारीच आपल्याला कोरोनापासून दूर ठेवेल. त्यातूनही जर अतिमहत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागत असेल, तर खबरदारी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे सांगितले आहे, असे दिग्दर्शक संकेत पाटील यांनी सांगितले. ऋतुराज फडके आणि यश नवले यांनी अभिनय केला असून संकल्पना आणि दिग्दर्शन संकेत यांचे आहे.