CoronaVirus News: कर्त्या पुरुषाचा बळी गेल्याने मोठी समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 23:42 IST2020-10-04T23:42:34+5:302020-10-04T23:42:52+5:30
CoronaVirus Thane News: शहीद पोलिसांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. परंतु, ही मदत तत्परतेने कुटुंबीयांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना कमावत्या पुरुषाच्या पश्चात घरखर्च कसा चालवायचा, असा यक्षप्रश्न पडला आहे.

CoronaVirus News: कर्त्या पुरुषाचा बळी गेल्याने मोठी समस्या
- प्रशांत माने
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावात आतापर्यंत पाच पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहीद पोलिसांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. परंतु, ही मदत तत्परतेने कुटुंबीयांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना कमावत्या पुरुषाच्या पश्चात घरखर्च कसा चालवायचा, असा यक्षप्रश्न पडला आहे.
डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक संतोष कळमकर (वय ५१) यांचा आॅगस्टमध्ये कोरोनाने मृत्यू झाला, परंतु या घटनेला महिना उलटूनही सरकारी मदत त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचलेली नाही. स्थानिक पोलिसांनी केलेल्या मदतीवर आतापर्यंत दिवस गेले, परंतु पुढील घरखर्च कसा भागवायचा, या विवंचनेत हे कुटुंब आहे. हेमंत करकरे आणि वाय.सी. पवार यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सेवा बजावलेले संतोष हे पाच वर्षांपासून रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कल्याण पूर्वेकडील तीसगावनाका परिसरातील विघ्नहर्ता पार्कमध्ये ते वास्तव्याला होते. २२ जुलैला कळमकरांना ताप आला. दुसºया दिवशी त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यात त्यांना लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, त्यांना सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांनी त्यांना घरीच क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला होता, परंतु कुटुंबाला संसर्ग होऊ नये, या काळजीपोटी कळमकरांनी निआॅन रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणे पसंत केले. चार ते पाच दिवस त्यांची प्रकृती बरी होती. मात्र, त्यानंतर प्रकृती गंभीर बनली. अखेर, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. १७ आॅगस्टला उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
कोरोनामुळे मुलींना नोकरी मिळणे झाले दुरापास्त
संतोष कळमकर यांच्यापश्चात पत्नी श्वेता आणि सुपर्णा, ऐश्वर्या अशा दोन मुली आहेत. दोन्ही मुलींनी पदवीचे शिक्षण घेतले आहे. कळमकर हे घरात एकटेच कमावते होते.
सुपर्णा सध्या नोकरीच्या शोधात आहे, परंतु तेही शक्य होत नाही. अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात रुजू होण्याचा निर्णय तिने घेतला आहे, परंतु भरती प्रक्रिया थांबल्याने तेही शक्य नाही.
वडिलांच्या उपचारासाठी तत्काळ आर्थिक मदत मिळाली, परंतु मृत्यूनंतरची मदत मिळालेली नाही. आईला निवृत्तीवेतनही चालू झालेले नाही. रामनगर पोलिसांनी सहकार्य केले.