CoronaVirus News: केडीएमसी हद्दीत आढळले २१२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:08 IST2020-06-19T00:07:51+5:302020-06-19T00:08:01+5:30
दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ६८ वर

CoronaVirus News: केडीएमसी हद्दीत आढळले २१२ रुग्ण
कल्याण : केडीएमसी हद्दीत गुरुवारी एका दिवसात तब्बल २१२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या दोन हजार ७७९ झाली आहे. तर, दुसरीकडे दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ६८ वर पोहोचली आहे.
रुग्णांच्या निकटवर्तीयांनाही संसर्ग झाला आहे. तसेच अनेक रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात २१२ रुग्ण आढळल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितले. मृतांमध्ये डोंबिवलीतील सावरकर रोड येथील ८१ वर्षांचा वृद्ध आणि कल्याण पूर्वेतील एफ केबिन रोडवरील ६५ वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या एक हजार ४७३ तर, एक हजार २३८ कोरोनामुक्त झाले आहेत.
आजींची कोरोनावर मात
डोंबिवली पूर्वेतील संत नामदेव पथ येथील रहिवासी सुमती नार्वेकर (वय ९२) यांनी कोरोनावर मात केली. त्या पूर्णत: बऱ्या झाल्याने गुरुवारी त्यांना घरी सोडण्यात आले. डॉ. मिलिंद शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. इच्छाशक्ती व उपचाराच्या आधारे कोरोनावर मात करता येते, हे त्यांनी दाखवून दिले.
केडीएमसीच्या डोंबिवली कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील दोन कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्याने या कार्यालयातील ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग कार्यालये गुरुवारी पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. सोमवारपासून ती नियमितपणे सुरू होतील, असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
कोरोनाची लागण झालेले दोघेही कर्मचारी ‘ग’ प्रभाग कार्यालयातील आहेत. या कर्मचाºयांचा वावर प्रभागक्षेत्र कार्यालयात राहिल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘ग’ आणि ‘फ’ कार्यालयांतील संपूर्ण आवार व अन्य विभागांमध्ये गुरुवारी निर्जंतुकीकरण करण्यात आले. रविवारपर्यंत दररोज निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. त्यामुळे ही कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, विभागीय कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्र व आपत्कालीन कक्ष सुरू राहील. सोमवारपासून ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग कार्यालये नियमितपणे सुरू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.