CoronaVirus Lockdown News: विकेण्ड लॉकडाऊनमध्ये पार्सलला मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 23:51 IST2021-04-08T23:51:04+5:302021-04-08T23:51:17+5:30
परीक्षार्थींना अत्यावश्यक प्रवासाला तर हॉटेलमधून आणि खाद्यपदार्थ गाडीवरून घरी पार्सल नेण्यासंदर्भात मुभा

CoronaVirus Lockdown News: विकेण्ड लॉकडाऊनमध्ये पार्सलला मुभा
ठाणे : विकेण्ड लॉकडाऊनमध्ये ठाणे महापालिका प्रशासनाने काही मुभा दिल्या आहेत. यामध्ये परीक्षार्थींना अत्यावश्यक प्रवासाला तर हॉटेलमधून आणि खाद्यपदार्थ गाडीवरून घरी पार्सल नेण्यासंदर्भात मुभा दिली आहे. हे आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार असल्याचे ठाणे महापालिकेने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
हे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी काढले असून आदेशाला विरोध करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट म्हटले आहे. ७ एप्रिल २०२१ रोजी महापालिकेने हे परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या विद्यार्थ्यांना / परीक्षार्थीना, स्पर्धा परीक्षांसह अन्य परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहवयाचे आहे, अशा परीक्षार्थींना या कालावधीतसुद्धा आवश्यक प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच संबंधित परीक्षार्थी यांच्याकडील हॉल तिकीट हा प्रवासाकरीताचा वैध आवश्यक पुरावा म्हणून मानला जाईल.
ऑनलाइन डिलिव्हरी देणाऱ्या अन्नपुरवठा करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेतील अन्न पुरवठाधारक इत्यादींसाठी आठवड्यातील सर्व दिवस २४ तास सेवा पुरविण्याची मुभा असेल, असे पत्रकात नमूद केले आहे.
फळविक्रेत्यांसह रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्री स्टॉल सुरू ठेवता येतील. परंतु, केवळ पार्सल सेवा किंवा खाद्यपदार्थ घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. तर डोळ्यांचे सर्व दवाखाने आणि चष्म्याची दुकाने या कालावधीत सुरू राहणार आहे. त्यामुळे संबंधितांनी अंमलबजावणी करावी. ती करण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई करण्यात येईल.