भिवंडी/वसई : भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर या विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. ही रेल्वे शनिवारी मध्यरात्री १२ वाजून ५८ मिनिटांनी भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून एक हजार १0४ कामगारांना घेऊन गोरखपूरकडे रवाना झाली. २२ डब्यांची ही विशेष गाडी रात्री वसई रोड रेल्वे स्थानकात दाखल झाली. पालघर जिल्ह्यात अडकलेल्या कामगार व मजुरांना घेऊन ती मार्गस्थ झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा तिसऱ्यांदा करण्यात आली. यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाºया कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच पुन्हा चौदा दिवसांचा लॉकडाउन वाढल्यानंतर भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशी विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, भिवंडी पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांना विशेष ट्रेन गोरखपूरसाठी सोडणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून शनिवारी सकाळी १0 वाजण्याच्या सुमारास सांगण्यात आले होते. शिंदे यांनी भिवंडी पोलीस परिमंडळमधील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राहणाºया गोरखपूरच्या कामगारांची विविध कागदपत्रे तपासून त्यांची गोरखपूरला जाण्यासाठी निवड करण्याचे निर्देश अधिकारी, कर्मचाºयांना दिले होते. त्यानुसार त्यांनी कामगारांना आधारकार्डचा पुरावा आणि प्रवास भाड्याचे ८00 रुपये घेऊन सहा पोलीस ठाण्यांतील नेमून दिलेल्या जागेवर दुपारी ३ वाजता एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मजुरांनी सर्वच ठिकाणी एकच गर्दी केल्याने विशेष श्रमिक ट्रेनची बुुकिंग काही वेळातच पूर्ण झाली होती. ही ट्रेन भिवंडी रेल्वे स्थानकातून शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुटणार होती. मात्र प्रवाशांची वैद्यकीय चाचणी आणि ओळखपत्र आदी तपासणीस उशीर झाल्याने मध्यरात्री १२ वाजून ५८ मिनिटांनी ट्रेन सोडण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी तिला हिरवा झेंडा दाखवला.९६ कामगारांना वगळले : भिवंडीतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गोरखपूर येथे जाणाºया प्रवाशांची निवड केली होती. भोईवाडा पोलीस ठाणे २११, भिवंडी शहर पोलीस ठाणे ३९५, शांतीनगर पोलीस ठाणे ६७, नारपोली पोलीस ठाणे ४२२, तर कोनगाव पोलीस ठाण्यातून १0५ अशा एकूण १२00 कामगारांचा यात समावेश होता. ९६ कामगार प्रवाशांना काही कारणांमुळे वगळण्यात आले आहे. त्यामुळे ही ट्रेन ११0४ कामगारांना घेऊन भिवंडी, वसई, सूरत, कानपूरमार्गे गोरखपूरकडे रवाना झाली.मुंबईतून राजस्थानला बस : २५ कामगारांची पहिली बस सीएसएमटी येथून रविवारी संध्याकाळी राजस्थानला गेली. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी आढावा घेतला. तसेच., दहिसरमधून राजस्थान, गुजरातला ४ बसेस पाठवल्या.