CoronaVirus: ३२ कोरोनाबाधितांनी जिंकली लढाई; बरे झालेल्यांमुळे आशादायक चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 00:33 IST2020-04-25T00:33:19+5:302020-04-25T00:33:29+5:30
हिमतीने केली आजारावर मात; वसई-विरार महापालिकेतील अनेक क्षेत्रे प्रतिबंधित

CoronaVirus: ३२ कोरोनाबाधितांनी जिंकली लढाई; बरे झालेल्यांमुळे आशादायक चित्र
विरार : वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळत असून ही संख्या शंभरापार गेली असल्याने एकीकडे चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे मात्र परिसरातील ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने आशादायक चित्रही निर्माण झालेले आहे. कोरोना आजारातून बरे होता येते, त्यासाठी जिद्द हवी आणि योग्य ती काळजी घ्यायला हवी.
कोरोनाबाधितांचा आकडा गुरुवारीच १०१ वर गेल्यामुळे आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात चिंता निर्माण झाली आहे. आतापर्यंत वसई-विरार परिसरातच ७ जणांना या आजारामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र त्याच वेळी वसई, नालासोपारा आणि विरार येथील ३२ रुग्णांनी हिमतीने या आजारावर मात करीत इतरांनाही आजाराशी लढण्याचे बळ दिले आहे.
पालघर जिल्ह्यातील या सर्व रुग्णांमधून आतापर्यंत ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालघरसह वसई-विरार महानगरपालिकेतील अनेक ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत.
वसई-विरार परिसरात सुरुवातीपासूनच नागरिकांनी हलगर्जीपणा केल्याचा फटका येथील नागरिकांना बसला आहे. परदेशातून आलेले आणि ‘होम क्वारंटाइन’ केलेले अनेक तरुण बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्याचेही आढळून आले होते. तसेच वसई, नालासोपारा आणि विरार परिसरात राहणारे अनेक लोक मुंबईमध्ये कामाला जात असल्यामुळे तेथून अनेकांना या जीवघेण्या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता अनेक रुग्ण या लढाईत कोरोनावर मात करताना दिसत असून हे चित्र दिलासादायक आहे.
कोरोनाच्या संसर्गाबाबत आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ३३५३ लोक देखरेखीखाली आहेत.१४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले १२३२ जण आहेत. लक्षणे आढळलेले २९ जण आहेत. कोरोनाबाधितांच्या सहवासात आलेले दोन हजार २२६ लोक असून जिल्ह्यात एकूण ११६ रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आलेली आहे.
राजोडी गावकऱ्यांचा सतर्कतेने कोरोनाशी यशस्वीपणे लढा
पारोळ : महाराष्ट्र तसेच मुंबईत वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या हा चिंतेचा विषय झाला असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले, तर आपण कोरोनाविरोधातील लढाई यशस्वीपणे जिंकू शकतो, हे वसई तालुक्यातील राजोडीकरांनी दाखवून दिले. या गावात कोरोनाचे तीन रुग्ण मिळाल्यानंतरही गावकºयांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तसेच नियमांचे पालन केल्याने येथील रुग्णांमध्ये अधिक वाढ झालेली नाही.
पंधरा दिवसांपूर्वी राजोडी गावातील तीन तरुण जहाजावरचे काम संपवून अमेरिकेवरून सुटीवर आपल्या घरी आले. चौदा दिवस स्वत:च्या घरी क्वॉरन्टाईन राहण्याच्या अटीवर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर म्हणजेच दोन आठवड्यांनंतर या तिघांचीही वैद्यकीय तपासणी केल्यावर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण राजोडी गाव हादरून गेले. तीनही कोरोनाबाधित तरुणांसोबतच त्यांच्या संपर्कात आलेले त्यांचे आई-वडील यांनाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्वॉरन्टाईन करण्यात आले. अशा या गंभीर परिस्थितीमध्ये संपूर्ण गावातील गावकºयांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाबाधित रुग्ण, त्यांच्या कुटुंबांना मदत केली.
गावकºयांच्या या सहकार्यामुळे रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सकारात्मक बळ मिळाले. यामुळेच दोन आठवड्याने फेरतपासणी केली असता, त्यांच्या आई -वडिलांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा या तिघा तरुणांची चाचणी करण्यात आली. त्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांनाही घरी पाठवण्यात आले.
गावकºयांनी सर्व नियमांचे योग्य पालन केल्याने हा रोग अधिक पसरला नाही. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे योग्य पालन केले तर राजोडीसारखी वसईही आपण कोरोनामुक्त करु शकतो, असे येथील ज्येष्ठ नागरिक चार्ली रोझारियो यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोना आजाराने ग्रासले म्हणजे सर्व संपले, असे वाटून अनेकजण हतबल होतात. मात्र, वसई-विरारमधील एकंदर ३२ जणांनी या आजारावर इच्छाशक्तीच्या जोरावर मात केली आहे. यामुळे या जीवघेण्या आजाराने बाधित झालेले अन्य रूग्णही अशाचप्रकारे लवकरात लवकर बरे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.