Corona Vaccination: ठाणे जिल्ह्यात आजचा दिवस पुरेल एवढीच लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:50 IST2021-04-09T00:50:40+5:302021-04-09T00:50:56+5:30
ग्रामीण भागात अवघ्या तीन दिवसांचा साठा; लसीकरण करण्यासाठी ठिकठिकाणी झुंबड

Corona Vaccination: ठाणे जिल्ह्यात आजचा दिवस पुरेल एवढीच लस
- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता कहर लक्षात घेऊन लसीकरण करणाऱ्यांची एकच झुंबड उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात गुरुवारी फक्त एक लाख २२ हजार ७२० लसींचा साठा शिल्लक आहे. यापैकी जिल्ह्यात सर्व सहा महापालिकांकडे शुक्रवारपर्यंत पुरेल एवढीच लस शिल्लक आहे. तर ग्रामीणमध्ये तीन दिवसांच्या लसीकरणाचा साठा आहे.
जिल्ह्यात कोविशिल्ड लस पसंतीला उतरल्यामुळे ती घेण्याकडे नागरिकांचा सर्वाधिक कल आहे. कोव्हॅक्सिन लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे वास्तव दिसून आले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात गुरुवारपर्यंत ६० लाख ९० हजार ४८० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक पहिला डोस घेणारे असून काहींना दुसरा डोस दिलेला आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी आणि शनिवार, रविवार दोन दिवस पूर्ण संचारबंदी लागू आहे. त्यामुळे या महामारीच्या चक्रव्युहातून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जिल्ह्यातील १८२ लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी झुंबड केली आहे.
शहरी भागात शुक्रवारी पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे. तर ग्रामीण भागातील गावपाड्यांना तीन दिवसांच्या लसींचा साठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्याभरातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील २९ लाख ७० हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यासाठी ६१ लाख ८० हजार ३६६ लसींचा पुरवठा होणे अपेक्षित आहे.
लसीकरणाचा पुरवठा जिल्ह्यात आजपर्यंत झालेला नाही. त्यामुळे शासन आदेशानुसार उपलब्ध लसींच्या साठ्यातूनच ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. त्यामुळे लसीचा तुटवडा भासत आहे. यासाठी लवकरच टप्प्याटप्प्याने लसींचा पुरवठा होणार असल्याचे जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी लोकमतला सांगितले.