परिस्थितीला स्वीकारून जुळवून घ्यायला कोरोनाने शिकवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:54+5:302021-03-22T04:36:54+5:30
धकाधकीच्या आयुष्यामुळे लांब गेलेली नाती जवळ आली, आपापसातले नातेसंबंध सुधारू लागले. विशेषत: पती पत्नीच्या नात्यात समजून घेण्यात सकारात्मक बदल ...

परिस्थितीला स्वीकारून जुळवून घ्यायला कोरोनाने शिकवले
धकाधकीच्या आयुष्यामुळे लांब गेलेली नाती जवळ आली, आपापसातले नातेसंबंध सुधारू लागले. विशेषत: पती पत्नीच्या नात्यात समजून घेण्यात सकारात्मक बदल झाले. बदललेल्या जीवनशैलीत अनेकांनी सुधारणा केल्या आणि आपल्या आहाराकडे लक्ष दिले. अनेक जण व्यायामाकडे वळले. काहीजण चक्क पाककलेत निपुण झाले, नवनवीन पदार्थ बनवायला शिकले. एकत्र कुटुंबात राहून एकमेकांची नव्याने काळजी घ्यायला लागले. पुरुषांनी आपली ऑनलाइन कामे करून घरकामातही मदत केली. वर्क फ्रॉम होममुळे बाहेर पडणे बंद झाल्याने प्रवास खर्च आणि इतर अतिरिक्त खर्च वाचू लागला. घरच्या घरी ऑनलाइन व्यायाम करून आपल्या आरोग्याकडे लक्ष देता आले. त्यामुळे बराच फरक पडला. पालकांना आपल्या मुलांना वेळ देता आला. या काळात कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवता आला. एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेता आली. आपल्यासोबत आपले कोणीतरी आहे याची जाणीव घरातील प्रत्येक सदस्याला झाली. विशेष म्हणजे कोरोनाकाळात आपल्या घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी विशेष काळजी घेऊ लागले.
दुसरीकडे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, व्यवसाय बंद झाले आणि हे सर्वजण बेरोजगार झाले. बेरोजगार झाल्यामुळे त्यांना नैराश्य येऊ लागले. शैक्षणिक नुकसान तर न भरून येण्याजोगे झाले. कोरोनाची लागण झालेले अनेक जण बरे झाले, काही दगावले, ज्यांच्या घरात कोरोनाग्रस्त मृत पावले त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या काळात अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली.
असे असतानाही कोरोना काळात लोक आहे त्यात आनंद मानायला शिकले. अनेक लोक कमी गरजांमध्ये जास्तीत जास्त सुख शोधायला शिकले. एकमेकांशी स्पर्धा विसरून एकमेकांच्या मदतीला धावून गेले. सामाजिक संस्था लोकांच्या मदतीला धावल्या. याशिवाय या काळात डाॅक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेविका यांच कार्य तर बहुमूल्य ठरले. या अशा अनेक परिस्थितीचा सामना करत आलेल्या परिस्थितीला स्वीकारत कोरोनाशी आनंदाने जुळवून घ्यायला शिकले. हे सर्व सामान्य लोकांचे आयुष्य झाले. पण दिव्यांगांच्या बाबतीत परिस्थिती अतिशय कठीण होती. त्यांना आणि त्यांच्या पालकांचे कोरोना आणि टाळेबंदीचे गणित समजेनासे झाले आहे. दिव्यांग विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नसल्याने त्यांची व त्यांच्या पालकांची मानसिकता समजून घ्यायला हवी.
आता सामाजिक अंतर ठेवून वागणे, सतत मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता हे सर्व बदल स्वीकारणे जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत.
- मीना क्षीरसागर,
मुख्याध्यापक,
विश्वास गतिमंद मुलांसाठीचे केंद्र,
ठाणे