Corona reserves space for victims | कोरोना बळींसाठी जागा आरक्षित

कोरोना बळींसाठी जागा आरक्षित

कुमाड बडदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : शहरातील कबरस्तानमध्ये पाऊण एकर जागा कोरोना बळींसाठी आरक्षित करण्यात आली आहे. या जागेत ४00 ते ४५0 मृतदेह दफन करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारपर्यंत या जागेत शासकीय निर्देशांचे पालन करून ६५ मृतदेह दफन करण्यात आले. यामध्ये शहराबाहेरील मृतांचाही समावेश आहे.
मुंब्य्रातील कौसा भागातील एमएम व्हॅली परिसरात हिंदूसाठी स्मशानभूमी, ख्रिश्चनांसाठी दफनभूमी तसेच मुस्लिम धर्मीयांसाठी कबरस्तानसाठी आरक्षित असलेल्या पाच एकर भूखंडापैकी तीन एकर भूखंडावर एक वर्षापूर्वी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नांमुळे कबरस्तान सुरू करण्यात आले.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असलेल्यांचे मृतदेह दफन करण्यासाठी जागा कमी पडू नये, तसेच या मृतदेहांमुळे कबरस्तानमध्ये इतर मृतदेह दफन करण्यासाठी येणाऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये, यासाठी कबरस्तानमधील एकूण भूखंडाच्या एक चतुर्थांश भूखंड कोरोना बळींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. वर्षभरात या कबरस्तानमध्ये तेराशेहून अधिक मृतदेह दफन करण्यात आले. यामध्ये कोरोनाचे बळी ठरलेल्या ६५ मृतदेहांचा समावेश आहे. यामध्ये मुंब्रा-कौसा, घाटकोपर, कुर्ला, भिवंडी, राबोडी, महागिरी, शीळफाटा आदी परिसरांतील बळींचा समावेश आहे. हे कबरस्तान सुरू होण्यापूर्वी अनेकांनी विरोध केला होता. हे कबरस्तान सुरू झाले नसते, तर येथील इतर, व कोरोना बळींचे मृतदेह दफन करण्याची मोठी समस्या निर्माण झाली असती.

मुस्लिम समाजाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आव्हाड यांच्या प्रयत्नांमुळे वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या कबरस्तानमध्ये पाऊण एकर जागा कोरोना बळींच्या दफनविधीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. रविवारपर्यंत येथे ६५ कोरोना बळींचे मृतदेह दफन करण्यात आले.
- लियाकत ढोले, सरचिटणिस, कौसा (नवीन) कबरस्तान

Web Title: Corona reserves space for victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.