घरी उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST2021-02-26T04:55:53+5:302021-02-26T04:55:53+5:30
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. परंतु, यामध्ये रुग्णवाढीत लक्षणे नसलेल्या ...

घरी उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्के
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. परंतु, यामध्ये रुग्णवाढीत लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ८५ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा ते इतरांच्या संपर्कात येऊ नये या उद्देशाने त्यांच्या हातावर आता महापालिकेने पुन्हा होम क्वॉरंटाइनचे शिक्के मारण्यास सुरुवात केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
ठाणे महापालिका हद्दीत सध्या ६१ हजार ३४४ रुग्ण असून ५८ हजार ६९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत एक हजार ३२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला एक हजार ३२० रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी हा ३२३ दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर आहे.
मागील आठ दिवसांपासून महापालिका हद्दीत १५० ते २०० रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. यापूर्वी शहरात दररोज ५० ते १०० रुग्ण आढळून येत होते. रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यामुळे महापालिका यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसतात. त्यामुळे ते शासनाच्या नियमानुसार घरीच उपचार घेतात. तर उर्वरित १५ टक्क्यांपैकी ३ ते ४ टक्के रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल होत असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विविध आजार असणे तसेच श्वास घेण्यास त्रास होणे अशा रुग्णांचा समावेश असतो. उर्वरित सुमारे १२ टक्के रुग्णही घरीच उपचार घेतात. असे रुग्ण घराबाहेर पडले तर, त्यांच्यामुळे संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना ओळखता यावे, यासाठी त्यांच्या हातावर शिक्के मारले जात होते. मात्र, गेल्या महिन्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याने ही पद्धत बंद केली होती. परंतु, शहरात आता रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासनाने घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. अशा रुग्णांना ओळखता यावे आणि त्यांच्यामुळे परिसरात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेतला असून त्यामध्ये कुणाचीही बदनामी करण्याचा उद्देश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातील आस्थापनांनी आपली वेळ आणि कोरोना नियमांचे पालन करावे. कोणालाही त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही. मात्र, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.