कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST2021-02-25T04:55:00+5:302021-02-25T04:55:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येत्या आठ दिवसांत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांनी पुढे ...

कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येत्या आठ दिवसांत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांनी पुढे ढकलले आहेत. तर, काहींनी ऑफलाइन आयोजित केलेले कार्यक्रम पुन्हा एकदा ऑनलाइन घेण्याला पसंती दिली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. मुख्य शहरांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. सरकारकडून लॉकडाऊनचे नियन पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर काही दिवस बंदीदेखील घातली. त्यामुळे शहरातील येत्या ८-१० दिवसांतील नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांनी पुढे ढकलले आहेत. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असतानाही खबरदारी म्हणून आयोजकांनी कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या पुढील सूचना येईपर्यंत कोणतेही कार्यक्रम न घेण्याचेदेखील त्यांनी ठरविले आहे. तर, काहींनी सभागृहात आयोजिलेले कार्यक्रम रद्द न करता ते ऑनलाइन घेण्याचे ठरविले आहे. प्रेक्षकांनीही ऑनलाइन कार्यक्रम घेण्याला दुजोरा दिला आहे.
-------------------------
येत्या २८ फेब्रुवारी रोजी सहयोग मंदिर येथे पुस्तक प्रकाशन आयोजिले होते. तसे व्यवस्थापकांना पत्रही दिले होते. परंतु, अनेकांनी सध्या कार्यक्रम घेऊ नका, असे सांगितल्याने सोहळा पुढे ढकलला आहे. आमची सातआठ पुस्तके प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत.
- प्रा. संतोष राणे, शारदा प्रकाशन
.....
मराठी ग्रंथसंग्रहालय आयोजित पुस्तक प्रकाशन, सत्कार सोहळा, पुरस्कार समारंभ होणार होते. हे सर्व कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करून तसे रसिकांनादेखील कळविले आहे.
- संजीव फडके, मराठी ग्रंथसंग्रहालय
आम्ही इतर कार्यक्रम रद्द केले आहेत. १४ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पत्रांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम करण्याचा विचार आहे. परंतु, कोरोनामुळे रूपरेषा ठरविली नाही. शासनाच्या पुढील आदेशाची वाट पाहणार आहोत.
- अमोल नाले, अनघा प्रकाशन
............
ठाणेनगर वाचनमंदिरात दोन कार्यक्रम आयोजिले होते. परंतु, ते रद्द न करता किंवा पुढे न ढकलता आम्ही ते ऑनलाइन घेणार आहोत. रिस्क नको म्हणून हा निर्णय घेतला आहे.
-केदार जोशी, ठाणेनगर वाचनमंदिर
---------------
चौकट
सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करा, अशी नोटीस ठाणे महापालिकेने बजावलेली नाही. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आहे. तसेच, कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल.
-संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका