Corona outside, water danger in the house | बाहेर कोरोनाचा, घरात पाण्याचा धोका

बाहेर कोरोनाचा, घरात पाण्याचा धोका

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनसामान्य अगोदरच त्रासले असताना, दोन दिवसांपासून पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन शासनाकडून केले जात असले तरी, पावसामुळे अनेकांना घरात राहणेही शक्य होत नाही. ठाणे शहरासह मीरा भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि उल्हासनगरातही घरांची पडझड झाली असून, अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे बाहेर कोरोनाचा तर घरात पाण्याचा धोका, अशा दुहेरी संकटात जनसामान्य सापडले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस ठाणे तालुका आणि शहर परिसरात पडला. ठाणे शहरात २६ झाडे पडली असून, वागळे ईस्टेटमध्ये एक किराणा दुकान नऊ घरांवर पडून नुकसान झाले. याशिवाय आगीच्या तीन किरकोळ घटना घडल्या. भिवंडी शहरातील अनेक रस्ते पावसाने उखडले आहेत. येथील ग्रामीण भागात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागालाही मुसळधार पावसाचा फटका बसला. कोंडेश्वरजवळील आदिवासी पाड्यांमध्ये अनेक घरांची मोठी पडझड झाली. या ग्रामीण भागातील संपूर्ण विद्युत यंत्रणा कोलमडली असून ती दुरुस्त करायला आठवडाभर लागण्याची शक्यता आहे. या भागातील अनेक मोठमोठे वृक्षही उन्मळून पडले आहेत.
डोंबिवलीत बुधवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याशिवाय दिवसभर वारा आणि पावसाचे प्रमाण चांगलेच होते. झाड आणि झाड्याच्या फांद्या पडण्याच्या घटना वगळता शहरात कोणतीही दुर्घटना घडली नाही.
उल्हासनगर शहरात जोरदार वाऱ्यासह संततधार पावसाने विजेचा लपंडाव सुरू असून आठपेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. याशिवाय दोन घरांच्या भिंतीही कोसळल्या.

कल्याण, डोंबिवलीत पावसासह सोसाट्याचा वारा

डोंबिवलीत ठिकठिकाणी झाडे पडली : विजेच्या लपंडावाने नागरिक त्रासले, बाजारपेठेत शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात बुधवारी रात्री सोसाट्याचा वाºयासह जोरदार पाऊस झाला. त्यात अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडल्याने नागरिकांची गैरसोय झाली. गुरुवारी दिवसभरात पावसाच्या लहानमोठ्या सरी कोसळल्या. डोंबिवली पूर्वेत सुनीलनगर आणि पश्चिमेला भावे सभागृहासमोर अशा दोन ठिकाणी झाडे पडली. मनपाच्या आपत्कालीन विभागातील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही झाडे हटवली.

कल्याण-डोंबिवलीत सोमवारपासून चांगला पाऊस झाला. गुरुवारी दिवसभर आकाश ढगाळलेले होते. अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या. रात्री पडलेल्या पावसामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लोकल सेवेचा अंदाज घेत सकाळी कामावर जाण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधी चौकात खासगी कंपन्या व अन्य सरकारी कार्यालयांतील कर्मचाºयांचीही कमी गर्दी होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर काहींनी एसटीने मुंबईने गाठली.
दुसरीकडे अनलॉकमध्ये सम-विषम पद्धतीने दुकाने उघडली जात आहेत. अनेक दुकानदारांनी सवलती देऊनही ग्राहकांनी पाठ फिरवली. पावसामुळे भाजीमार्केटमध्ये फारसी गर्दी नव्हती. श्रावणी शुक्रवारसाठी फळे, फुले, हार आणि दुग्धजन्य पदार्थांची लोकांनी खरेदी केली.
 

Web Title: Corona outside, water danger in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.