पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या जुळ्या भावंडांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 23:14 IST2020-07-30T23:14:15+5:302020-07-30T23:14:32+5:30
दरम्यान जनतेच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पोलीस कर्मचारी देवाच्या रुपात हे रस्त्यावर उतरले आहेत.

पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या जुळ्या भावंडांचा कोरोनाने मृत्यू
अंबरनाथ :- पोलीस दलातल्या २ जुळ्या भावांचा ८ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके यांचा कोरोनामुळे दु:खद निधन झाले आहे. राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दरम्यान जनतेच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पोलीस कर्मचारी देवाच्या रुपात हे रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान अनेक पोलिसांना आपला जीवही गमवावा लागत आहे. त्यातच अंबरनाथमधून आणखी एक दु:खद घटना समोर आली आहे. दोन्ही भाऊ पोलीस दलात सेवा बजावत होते. दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते, तर जयसिंग घोडके अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते.
हे दोघेही जुळे भाऊ एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते आणि त्यांनी एकत्रच ट्रेनिंग देखील पूर्ण केलं होतं. दिलीप घोडके यांचा २० जुलै रोजी तर जयसिंग घोडके यांचा २८ जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.