गर्दीमध्ये कोरोना तर गर्दी नसताना चोरट्यांची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:38+5:302021-06-05T04:28:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सध्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील महिला, पुरुषांना रेल्वेप्रवासाची मुभा आहे. अशावेळी गर्दी असताना कोरोनाची तर ...

गर्दीमध्ये कोरोना तर गर्दी नसताना चोरट्यांची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सध्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेतील महिला, पुरुषांना रेल्वेप्रवासाची मुभा आहे. अशावेळी गर्दी असताना कोरोनाची तर गर्दी नसताना चोरट्यांची भीती वाटते. अनेकदा असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे रेल्वेने अधिक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
ठाणे महापालिकेच्या साकेत येथील ग्लोबल कोविड रुग्णालयातील परिचारिका किरण पाटील या वासिंद ते ठाणे असा रोज प्रवास करतात. त्या म्हणाल्या, सध्या कोरोनामुळे रेल्वेत तशी गर्दी कमी असते. अशावेळी चोरट्यांची किंवा छेडछाडीच्या प्रकाराचीही भीती असते. एक वर्षापूर्वी वासिंद आटगाव दरम्यान एका महिलेवर रेल्वेतच लैंगिक अत्याचार करून तिला आटगाव स्थानकाजवळ रेल्वेतून बाहेर फेकण्यात आले होते. टिटवाळ्यापर्यंत भीतीदायक वातावरण असते. ठाण्यातून जाताना कल्याणनंतर आरपीएफचे पोलीस कधी असतात, तर कधी कोणीच नसते. त्यामुळे अनेकदा असुरक्षिततेची भावना असते.
ठाणे ते मुलुंड दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आणखी एक लॅब टेक्निशियन प्रीती सोलाट म्हणाल्या, अनेकदा रात्री ९ नंतर लेडिज डब्यात पोलीस असतात. पण, रात्री ११ नंतर महिलांच्या एका डब्यात पुरुषांनाही परवानगी असल्यामुळे प्रवासात असुरक्षितता वाटते. रेल्वेतून उतरल्यानंतर फलाटावर कोणीच नसेल तर आणखी भीती वाटते. त्यामुळे रेल्वेसह आणि रेल्वेस्थानक परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची गरज आहे. कळव्यात घडलेली घटना तर अंगावर शहारे आणणारी आहे. अशा आरोपींना कडक शासन झाले पाहिजे. मुळात, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असताना चोरटे रेल्वेत शिरतातच कसे, हा मोठा प्रश्न आहे, असेही त्या म्हणाल्या. तर ठाणे ते मुलुंड दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या उर्मिला कोपतरे या अन्य एक लॅब टेक्निशियन म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी आरपीएफने आमचे मोबाइल क्रमांक घेतले. काही आपत्ती ओढवल्यास मदतीसाठी ग्रुप केला होता. पुढे त्याचे काय झाले, हे कळलेच नाही. अनेकदा पिक अवरमध्ये प्रॉब्लेम नसतो. दुपारी आणि रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीची गरज आहे. सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्याची आवश्यकता आहे.
२० वर्षांत वाईट अनुभव कधीच नाही
गेल्या २० वर्षांपासून ठाणे ते कल्याण रेल्वेने प्रवास करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या चिरागनगर आरोग्य केंद्राच्या परिचारिका शोभा कमाने यांना मात्र रेल्वेप्रवासाचा चांगला अनुभव आहे. त्या म्हणाल्या, गेल्या २० वर्षांत या प्रवासात वाईट अनुभव आलेला नाही. अनेकदा फास्ट लोकलने प्रवास केला. लेडिज डब्यात पोलीसही असतात त्यामुळे सुरक्षित वाटते.