भाजपाच्या बेकायदा फलकावरून उफाळणार वाद
By Admin | Updated: March 23, 2017 01:23 IST2017-03-23T01:23:32+5:302017-03-23T01:23:32+5:30
भाजपा आमदार नरेंद्र मेहता प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेचा नामफलक पालिका मुख्यालयाबाहेर बेकायदा लावण्यात आला

भाजपाच्या बेकायदा फलकावरून उफाळणार वाद
भार्इंदर : भाजपा आमदार नरेंद्र मेहता प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेचा नामफलक पालिका मुख्यालयाबाहेर बेकायदा लावण्यात आला आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पालिका इतर संघटनांच्या नामफलकाला परवानगी दिली जात नसल्याने त्यांनीही तेथे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नामफलक ावरून वाद होण्याची शक्यता आहे.
मेहता यांनी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीवर सत्ता मिळविण्यासाठी २०१६ मध्ये मीरा-भार्इंदर श्रमिक जनरल कामगार संघटना स्थापन केली. या संघटनेचा नामफलक पालिकेची कोणतीही परवानगी न घेता मुख्यालयाबाहेर लावण्यात आला. त्याचे उद्घाटनही कामगार मंत्र्यांच्याच हस्ते झाले. यावर पालिकेने कोणताही आक्षेप न घेता बेकायदा फलकाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक महिन्यांपासून पालिकेकडे इतर कामगार संघटनांनी परवानगी मागितल्यानंतरही त्यांना प्रशासनाने परवानगी नाकारली. तसेच त्यांना संघटनेचा नामफलक लावण्यासही मनाई केली. मग भाजपा प्रणित संघटनेचा नामफलक प्रशासनाच्या लक्षात येत नाही का, असा सवाल इतर संघटनांनी उपस्थित केला आहे. यामुळे नामफलकावरुन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिकेत भाजपा-सेना युतीची सत्ता आहे. यातील सेनेची मीरा-भार्इंदर कामगार सेना अनेक वर्षांपासून कार्यरत असतानाही पालिकेने या संघटनेच्या नामफलकाला परवानगी दिलेली नाही. मात्र भाजपाच्या दबावाखाली प्रशासन कारभार चालवित असून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाच्या मनाई आदेशाला झिडकारुन आपापल्या संघटनांचेही फलक लावण्यासाठी अन्य कामगार संघटना पुढे सरसावल्या आहेत. (प्रतिनिधी)