वादग्रस्त उपायुक्त म्हसाळ पुन्हा पालिका सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:36+5:302021-04-03T04:36:36+5:30

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेत २०१५ ते २०१८ या काळात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उपायुक्तपदी राहिलेल्या विजयकुमार म्हसाळ ...

Controversial Deputy Commissioner Mhasal returns to municipal service | वादग्रस्त उपायुक्त म्हसाळ पुन्हा पालिका सेवेत

वादग्रस्त उपायुक्त म्हसाळ पुन्हा पालिका सेवेत

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेत २०१५ ते २०१८ या काळात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उपायुक्तपदी राहिलेल्या विजयकुमार म्हसाळ यांना सरकारने पुन्हा मीरा- भाईंदर महापालिकेत उपायुक्तपदी नेमल्याने शिवसेना प्रणित कामगार सेनेने या नियुक्तीला विरोध केला आहे. म्हसाळ हे वादग्रस्त आणि अनेक आरोप असलेले अधिकारी असल्याने त्यांना हटवले नाही तर आंदोलनाचा इशारा कामगार सेनेने दिला आहे.

कामगार सेनेचे सरचिटणीस श्याम म्हाप्रळकर यांनी म्हसाळ यांच्या नियुक्ती विरोधात तक्रार करतानाच गंभीर आरोप केले आहेत. म्हसाळ हे २०१५ ते २०१८ या कालावधीत महापालिकेत उपायुक्त मुख्यालय म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. त्या नंतर त्यांची बदली ठाणे महापालिकेत झाली. ठाणे महापालिकेतून पुन्हा त्यांना मीरा- भाईंदर महापालिकेत उपायुक्त म्हणून नेमले आहे. भाईंदर महापालिकेत कार्यरत असताना म्हसाळ यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराचे आरोप झाल्याने ते वादग्रस्त राहिले. त्यांच्या विरुद्धच्या तक्रारी प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांमध्येही त्यांच्या विरोधात नाराजी होती. कामगार सेनेच्या तक्रारीवरून तत्कालीन अतिरिक्त आयुक्त यांनी त्यांची चौकशी करून अहवाल १८ जानेवारी २०१९ रोजी आयुक्तांना सादर केला होता. तो अहवाल अजून कार्यवाहीच्या प्रतीक्षेत आहे.

बऱ्याच जणांना त्यांनी नियमबाह्य पदोन्नती दिल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तसेच त्यांच्याच काळात पालिकेच्या मालकीचे वाहन चोरीला गेले व त्याचीही त्यांनी पोलिसात तक्रार केलेली नाही. कर्मचाऱ्यांची रजा शिल्लक नसताना त्यांना सहा सहा महिन्यांचा पगार देऊन भ्रष्टाचार केला आहे. सेवा शर्ती नियमानुसार पालिकेत उपायुक्तपदाची चार पदे मंजूर आहेत. त्यातील दोन पदे प्रतिनियुक्तीने भरायची असून ती सरकारने उपायुक्त म्हणून संभाजी वाघमारे व अजित मुठे यांना नेमून भरलेली आहेत.

म्हसाळ यांची नियुक्ती नियमबाह्य

पालिकेतून भरायच्या दोन उपायुक्तांपैकी एक पद डॉ. संभाजी पानपट्टे यांचे असून दुसरे उपायुक्त पद हे पालिकेतीलच अधिकाऱ्याच्या पदोन्नतीने भरले पाहिजे. असे असताना म्हसाळ यांची नियुक्ती नियमबाह्य आहे. पालिका अधिकाऱ्यांवर अन्यायकारक असल्याचे म्हाप्रळकर यांनी म्हटले आहे. या विरोधात मुख्यमंत्री आणि सरकारकडे तक्रार करणार असून म्हसाळ यांना हटवले नाही तर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Controversial Deputy Commissioner Mhasal returns to municipal service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.