ठाण्यात कंटेन्मेंट झोन वाढले, मुंब्रा आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 04:15 PM2020-05-26T16:15:08+5:302020-05-26T16:15:35+5:30

कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना शहरात कंटन्मेंट झोनची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यानुसार शहरात आजच्या घडीला २३५ कंटेन्मेट झोन असून १२ दिवसात ७८ ने यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Containment zone increased in Thane, Mumbra in the lead | ठाण्यात कंटेन्मेंट झोन वाढले, मुंब्रा आघाडीवर

ठाण्यात कंटेन्मेंट झोन वाढले, मुंब्रा आघाडीवर

Next

ठाणे : शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या जशी वाढत आहे. तसेच शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढतांना दिसत आहे. ठाणे शहरात गेल्या १३ दिवसात झपाट्याने कोरोना रु ग्णाच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने अद्ययावत कंटेन्मेंट झोनची यादी जाहीर केली असून यामध्ये तब्बल २३५ झोनचा समावेश करण्यात आला आहे. १२ दिवसांपूर्वी हाच आकडा १६१ वर होता. ज्या प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये कंटेन्मेंट झोनची वाढ झाली आहे त्यात सर्वात आघाडीवर मुंब्रा त्यानंतर लोकमान्य नगर ,नौपाडा -कोपरी आणि वागळे प्रभाग समितीचा समावेश करण्यात आला असून हे सर्व झोपडपट्टीचा भाग असल्याने या भागात कंटेन्मेंटच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे मोठे आवाहन पालिका प्रशासनासमोर आहे.
               ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या २८ दिवसात कोरोना रु ग्णांच्या संख्येत गुणाकार पद्धतीने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात टेस्ट करण्याचे प्रमाण वाढले असल्याने रु ग्णसंख्या वाढत असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी ठाण्यासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी रु ग्णसंख्या वाढत आहे ते भाग कंटेन्मेंट झोन म्हणून प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात येत आहे. वागळे इस्टेट आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती रु ग्ण संख्येत आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या भागातील करोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे राहिले आहे. काही दिवसांपुर्वी शहरात ११३ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. त्यामध्ये ९७ इमारती आणि उर्वरीत झोपडपट्टी, चाळींच्या परिसराचा समावेश होता. मात्र, या संख्येत आता वाढ झाली असून शहरातील प्रतिबंधित क्षेत्राचा आकडा १६१ इतका झाला होता. यामध्ये मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येकी २६, सावरकर-लोकमान्यनगर प्रभाग समितीत २१, वागळे इस्टेट प्रभाग समितीत २०, नौपाडा प्रभाग समिती १७ प्रतिबंधित क्षेत्र असून हे सर्वच परिसर महापालिकेने जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीत आघाडीवर होते. गेल्या १२ दिवसांमध्ये मात्र या कंटेन्मेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली असून यामध्ये मुंब्रा सर्वात आघाडीवर आहे. वारंवार घराबाहेर पडू नका असे आवाहन करूनही मुंब्य्रातील नागरिक ऐकत नसल्याने या ठिकणी रु ग्णसंख्या देखील वाढत असून कंटेन्मेंट झोनमध्ये देखील वाढ होत आहे. मुंब्य्रानंतर नौपाडा-कोपरी, लोकमान्य नगर ,माजिवडा, वागळे ,अशा प्रभाग समित्यांमधील झोनचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवीन आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांवर कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान आहे.
प्रभाग समिती निहाय झोनची संख्या उथळसर - २१, माजिवडा -२७ वर्तकनगर - १३, लोकमान्य नगर - ३३, वागळे -२५, नौपाडा-कोपरी - ३५, कळवा - २६ मुंब्रा - ३९, दिवा - १६ असे एकूण २३५ कंटेन्मेंट झोन आहेत.
 

Web Title: Containment zone increased in Thane, Mumbra in the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.