पाणथळ जागेवर बांधकाम
By Admin | Updated: February 16, 2016 02:22 IST2016-02-16T02:22:27+5:302016-02-16T02:22:27+5:30
डोंबिवलीपासून जवळच असलेल्या कोपर व खंबाळपाडा, ठाकुर्ली, कल्याण समांतर रस्त्याला लागून असलेल्या पाणथळ जागेवर चाळी आणि बड्या

पाणथळ जागेवर बांधकाम
डोंबिवली : डोंबिवलीपासून जवळच असलेल्या कोपर व खंबाळपाडा, ठाकुर्ली, कल्याण समांतर रस्त्याला लागून असलेल्या पाणथळ जागेवर चाळी आणि बड्या इमारती उभ्या राहिल्याने या ठिकाणच्या पाणथळ जागा बिल्डर व चाळमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकाराकडे कल्याण-डोंबिवली महापालिका, पर्यावरण खात्याचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पाणथळ जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांचे फावले आहे.
तसेच चाळीच्या चाळी उभारण्याचा सपाटाच चाळमाफियांनी लावला आहे. यापूर्वी कोपरला रेल्वे स्टेशन होते, ते अप्पर कोपर होते. दिवा-वसई रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा होती. चाळमाफियांनी पाणथळ जागेवर अतिक्रमण केले. त्या ठिकाणी भराव टाकून बिल्डरांनी इमारती बांधल्या. चाळमाफियांनी चाळी बांधल्या. त्यातून कोपर रेल्वे स्थानकाची मागणी पुढे आली. आता कोपर रेल्वे स्टेशन आहे. स्टेशन झाल्यापासून या भागात पाणथळ जागेवरील बेकायदा बांधकामांना ऊतच आला आहे. तोच प्रकार कल्याण-ठाकुर्ली समांतर रस्त्यालगत दिसून येत आहे. खंबाळपाडा, ठाकुर्लीनजीक मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा होती. त्या ठिकाणी खाडीला भरती आल्यावर पाणी त्या भागात शिरण्यास वाव होता. त्या ठिकाणी मोठी संकुले उभारली आहेत. पाणथळ जागी भराव टाकून इमारती उभारल्याने खंबाळपाडा परिसर पूर्ण इमारतींनी भरून गेला आहे. हा पूर्ण पट्टा मोकळा होता. कोपर ते दिवा ही मोकळी जागा बेकायदा चाळींनी जोडली जाणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला आदेश दिले आहेत की, सरकारने सर्व पाणथळ जागांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी बांधकामे होऊ देऊ नयेत. होत असलेली बेकायदा बांधकामे थांबवावीत. सरकारने अद्याप तरी असा कोणताही अहवाल तयार केला नाही. तयार करण्याचे कामही हाती घेतलेले नाही. जागेचे भाव वाढल्याने जागेला किंमत आली आहे. त्यामुळे बिल्डरांकडून सर्रासपणे पाणथळ जागा भराव टाकून बुजवल्या जातात. त्या ठिकाणी बांधकामे केली जातात. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. त्या ठिकाणी महापालिका बांधकामाला परवानगी कशी देते? परवानगी देत नसेल तर बेकायदा बांधकामांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
एनव्हायरो वेल्फेअर सोसायटीचे अश्विन अघोर यांनी सांगितले की, पाणथळ जागा वाचवण्याविषयी सरकारची प्रचंड अनास्था आहे. त्याचबरोबर, स्थानिक स्वराज्य संस्था आणि वन खातेही त्याला तितकेच जबाबदार आहे. पाणथळ जागा वाचवल्या नाहीत तर भविष्यात एका दिवसाला ५०० मिलिमीटर पाऊस पडला तरी ज्या पाणथळ जागेवर बेकायदा बांधकामे उभी आहेत, ती पाण्याखाली जातील. ही भयावह परिस्थिती केवळ डोंबिवली परिसरात नाही, तर ठाणे-नाशिक हाय वे ला भिवंडी बायपास ते ठाण्यापर्यंतच्या पाणथळ जागेवरही तेच होत आहे. ईस्टर्न हाय वे लगत आणि उरणलाही हीच परिस्थिती आहे. याचा सर्वसमावेशक विचार होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)