घोसाळी स्मशानभूमीचे बांधकाम अपूर्ण
By Admin | Updated: September 26, 2015 22:16 IST2015-09-26T22:16:53+5:302015-09-26T22:16:53+5:30
मोखाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घोसाळी गावामध्ये शासनाच्या विकास निधीतून फेब्रुवारीपासून स्मशानभूमीचे बांधकाम सुरू करण्यात आले.

घोसाळी स्मशानभूमीचे बांधकाम अपूर्ण
मोखाडा : मोखाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घोसाळी गावामध्ये शासनाच्या विकास निधीतून फेब्रुवारीपासून स्मशानभूमीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, आज ७ ते ८ महिन्याचा कालावधी उलटला तरी ते अपूर्ण आहे. तसेच ते निकृष्ट असल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची स्थानिकांत चर्चा आहे.
एक लाखाच्या घरात लोकसंख्या असलेल्या मोखाडा तालुक्यात जवळपास २८ ग्रामपंचायती असून त्या दुर्गम भागात असल्याने पेसा कायद्या अंतर्गत येतात. शासनाकडून भविष्यकाळात लाखो रुपयांचा निधी या ग्रामपंचायतीना विकास कामासाठी दिला जाणार आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीना मिळालेल्या जनसुविधा योजनेच्या विकास निधीतून हाती घेण्यात आलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने आता मिळणाऱ्या या निधीतून तरी विकास कामे दर्जेदार होतील का, हा प्रश्न आहे.
तालुक्यांतील अनेक गावपाड्यांना जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीच्या बांधकामासाठी लाखोंचा निधी खर्चून स्मशानभूमीची इमारत व सभोवती संरक्षक भिंती तसेच शंभर मीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत. यापैकी घोसाळी येथील स्मशानभूमी व शंभर मीटर रस्त्याच्या बांधकामासाठी माती मिश्रीत रेती, जुने हलक्या दर्जाचे लोखंडी पोल जे बांधकाम पूर्ण व्हायच्या अगोदरच वाकले आहेत. अशी स्थिती आहे त्यावरुन बांधकामाचा दर्जा किती निकृष्ट आहे शिवाय हे कामही ठेकेदारने अर्धवट सोडले आहे.
या बांधकामाचे बिल ते पूर्ण झाले असे दाखवून ठेकेदाराला अदा केल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे या बांधकामाची वरिष्ठाकडून सखोल चौकशी करुन संबधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)