लुटीसाठी गोळीबार करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील हवालदाराला अटक

By जितेंद्र कालेकर | Published: October 16, 2023 08:31 PM2023-10-16T20:31:06+5:302023-10-16T20:32:07+5:30

ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा

Constable of Mumbai police force arrested for shooting for loot | लुटीसाठी गोळीबार करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील हवालदाराला अटक

लुटीसाठी गोळीबार करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील हवालदाराला अटक

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: तब्बल ४० ते ४२ लाखांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी पडघा परिसरात दोघांवर गोळीबार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई पोलिस दलातील सूरज ढोकरे (३७) या पोलिस हवालदाराला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला २० ऑक्टाेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मेंदे गावाजवळ १३ ऑक्टाेबर २०२३ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दोघांवर गोळीबार करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्हयाच्या घटनास्थळाच्या पाहणी दरम्यान तसेच एकंदरीत प्राथमिक तपासावरून हा गुन्हा चोरीच्या उद्देशाने केल्याचे उघड झाले होते. याच पार्श्वभूमीवर कोकण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपुरीचे उप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शहापूरचे मिलींद शिंदे, पडघा पोलिस निरीक्षक संजय साबळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे आदींच्या पथकाने अधिकचा तपास केला. तेंव्हा गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर अहमदनगर पोलिसांच्या मदतीने एका संशयीतास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून या गुन्हयात वापरलेले पिस्टलही जप्त करण्यात आले.

सखोल चौकशीत सुरज ढोकरे असे त्याचे नाव समोर आले. तो मुंबई पोलिस दलातील शस्त्र दुरुस्ती कार्यशाळेत हवालदार म्हणून कार्यरत आहे. त्याच्यावर वेगवेगळया बँकांचे आणि पतपेढीचे सुमारे ४० ते ४२ लाखांचे
कर्ज होते. या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यासाठी पैशांची गरज असल्याने चोरीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचीही त्याने कबूली दिली. त्यानंतर त्याला १५ ऑक्टाेंबर राेजी अटक करण्यात आली. भिवंडी व अंबाडी परिसरात तो दोन वेळा आल्याचेही त्याने सांगितले. त्याने यापूर्वीही असा प्रकार केला आहे का? त्याचे आणखी काेणी साथीदार आहेत का? याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी दिली. या तपासामध्ये पडघा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन मुदगन, स्थानिक गुन्हे शाखेचे उप निरीक्षक महेश कदम आणि कसारा पाेलिस ठाण्याचे सागर जाधव आदींनीही मोलाची कामगिरी बजावली आहे.

Web Title: Constable of Mumbai police force arrested for shooting for loot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक