उल्हासनगरचे सर्व प्रश्न काँग्रेस पक्ष सोडवणार
By Admin | Updated: February 14, 2017 02:42 IST2017-02-14T02:42:27+5:302017-02-14T02:42:27+5:30
उल्हासनगरमधील सर्व मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देणारा काँग्रेसचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित करण्यात आला.

उल्हासनगरचे सर्व प्रश्न काँग्रेस पक्ष सोडवणार
उल्हासनगर : उल्हासनगरमधील सर्व मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देणारा काँग्रेसचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित करण्यात आला. उल्हासनगरचे मतदार सुज्ञ असून ते या जाहीरनाम्याची दखल घेतील, असे नेत्यांनी या वेळी जाहीर केले. प्रवक्ते सुभाष कानडे आणि कॅप्टन निलेश पेंढारी यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित झाला.
उल्हासनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयराम लुल्ला यांच्या नेतृत्वाखाली या समस्यांचा अभ्यास करण्यात आला. त्या सोडवण्यासाठी त्यांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला. या वेळी सर्व उमेदवार हजर होते. मोफत आणि २४ तास पाणी देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात आहे. शहर सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. खड्डेमुक्त सिमेंट काँक्रिट रस्ते, रुग्णालय, चांगल्या आरोग्य सेवा, ब्लडबँक, अतिदक्षता विभाग निर्माण करणे, २०० बेडचे स्वतंत्र रुग्णालय, शिक्षण विभागामार्फत मोफत शैक्षणिक सुविधा, संगणकीकृत शैक्षणिक सुविधा, प्रत्येक प्रभागात स्वतंत्र अभ्यासिका, शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढणे, झोपडपट्टीचा सुनियोजित विकास करून जीवनमान उंचावणे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी मैदान उपलब्ध करणे, गोलमैदान आणि सपना गार्डनमध्ये इनडोअर गेम्स, ओपन जिम, प्रत्येक प्रभागासाठी लोकपाल समितीची स्थापना करून कामांवर लक्ष ठेवणे आणि भ्रष्टाचार रोखण्याचे काम करणे. प्रत्येक प्रभागात लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे एकाच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे त्यात म्हटले आहे.
मुस्लिमांसाठी स्वतंत्र दफनभूमी, सर्व शाळांचे नूतनीकरण, प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, शहरात भाजी आणि मच्छी मार्केट उभारणे, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवणे आणि शहर वायफायने जोडणे आदी आश्वासनांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
या वेळी सुभाष कानडे, निलेश पेंढारी, जयराम लुल्ला, जया साधवानी, रोहित साळवे, आजाद शेख, गोपी हसिजा आणि रवींद्र श्रीवास्तव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)