वसंत डावखरे यांना काँग्रेसचा पाठिंबा
By Admin | Updated: May 12, 2016 03:19 IST2016-05-12T03:19:48+5:302016-05-12T03:19:48+5:30
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना काँग्रेस पक्षाने बुधवारच्या बैठकीत अधिकृत पाठिंबा जाहीर केल्याची माहिती

वसंत डावखरे यांना काँग्रेसचा पाठिंबा
ठाणे : ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना काँग्रेस पक्षाने बुधवारच्या बैठकीत अधिकृत पाठिंबा जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मात्र याबाबत दिल्लीतून घोषणा होण्याची अपेक्षा
असल्याचे सांगितले. दरम्यान, वसंत डावखरे गुरुवारी दुपारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
त्यांच्याविरोधात शिवसेनेत अनेक इच्छुक असले तरी शिवसेनेने ही निवडणूक लढवणार की नाही आणि लढवल्यास नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाईल, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ठाण्याच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी डावखरेंना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले होते. पक्षातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी गेल्या आठवड्यात आमदार निरंजन डावखरे यांनी त्यांची भेट घेऊन पाठिंब्याबाबत रीतसर विनंतीही केली होती. त्यानंतर पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारच्या बैठकीत पक्षाचा अधिकृत निर्णय होईल, असे सांगितले होते. त्यानुसार या बैठकीत पाठिंब्याचा निर्णय झाल्याची माहिती तटकरे यांनी दिली. त्याला आता काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचा होकार अपेक्षित असल्याचे ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.