मुंब्य्रात काँग्रेस पक्षाला पडले खिंडार
By Admin | Updated: November 16, 2016 04:30 IST2016-11-16T04:30:17+5:302016-11-16T04:30:17+5:30
काही दिवसांपासून थांबलेले इनकमिंग, आऊटगोर्इंगने आता पुन्हा एकदा वेग पकडला असून नोटा बंदीमुळे लांबलेले पक्षप्रवेशही

मुंब्य्रात काँग्रेस पक्षाला पडले खिंडार
ठाणे : काही दिवसांपासून थांबलेले इनकमिंग, आऊटगोर्इंगने आता पुन्हा एकदा वेग पकडला असून नोटा बंदीमुळे लांबलेले पक्षप्रवेशही आता सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे यात काँग्रेसला ठाण्यात आणखी एक जबर धक्का बसला असून पक्षाचे गटनेते राजन किणे त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका अनिता किणे, रेश्मा पाटील, माजी नगरसेविका सुनिता सातपुते आणि मुंब्य्राचे पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष रमेश पाटील, मोरेश्वर किणे यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला हा मुंब्य्रातील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपासून काँग्रेसमधील बंद असलेली गळती पुन्हा एकदा सुरु झाली आहे. ठाण्यातील काँग्रेसचे नगरसेवकांना शिवसेना आणि भाजपाने आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर आता कळवा, मुंब्य्रात राष्ट्रवादीने आपली ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंब्य्रातील काँग्रेसच्या सहापैकी उपरोक्त तीन नगरसेवकांना राष्ट्रवादीने आपल्या पक्षात आणले आहे. यावेळी कळवा, मुंब्य्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, नजीब मुल्ला, स्थानिक नगरसेवक शानू पठाण आदी उपस्थित होते.
एकीकडे ठाण्याच्या भागात शिवसेना आणि भाजपा आपली ताकद वाढविण्यासाठी व्युव्हरचना आखत असतांना दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपला बालेकिल्ला आणखी मजबुत करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवकांना आपल्या पक्षात सामील करुन घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्यात हे तीन नगरसेवक घेतल्यानंतर पुढील टप्यात आणखी बडे मासे पक्षात येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. परंतु, दुसरीकडे काँग्रेसची भिस्त देखील ही मुंब्य्रावर अधिक अवलंबून होती, आधीच शहरात पक्षाला फटका बसलेला आहे. आता तर मुंब्य्रात राष्ट्रवादीने त्या पक्षाला खिंडारच पाडले आहे. (प्रतिनिधी)