कल्याण : मुद्रा लोन काढून देते, बचतगटांमध्ये पैसे गुंतवणूक करते, असे सांगून महिलांकडून पैसे उकळून ते त्यांना परत न दिल्याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी शमीम बानो या महिलेस अटक केली आहे. तिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बानो ही काँग्रेस पक्षाची पदाधिकारी आहे. त्याचबरोबर ती कल्याण तहसील कार्यालयासमोर स्टॅम्प वेंडरचा व्यवसाय करते. या निमित्ताने तिच्या संपर्कात आलेल्या महिलांना तिने मुद्रा लोन काढून देते. बचतगट स्थापन करून निधी मिळवून देते अशी बतावणी केली. तिच्या या बोलण्यास महिला बळी पडल्या. त्यांनी तिच्याकडे पैसे जमा केले. महिलांना लोन मिळाले नाही म्हणून महिलांनी तिच्याकडे पैशाची मागणी केली असता तिने दिलेले पैसे परत करण्यास नकार दिला. संतप्त महिलांनी शिवसेना महिला आघाडीच्या विजया पोटे, आशा रसाळ, माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्याकडे संपर्क साधला. त्यानंतर संतप्त महिलांनी बानोला गाठून जाब विचारून चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. बानो हिने फसवणूक केलेल्या महिलांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर यांनी याप्रकरणी बानोला अटक केली आहे. तिच्यासह तिच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बानोने तीन लाख २९ हजार रुपये या महिलांकडून उकळल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अशा प्रकारे अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास महिलांनी पुढे येऊन पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वैशाली गुळवे करीत आहेत.
-------------