भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील सध्या नेतृत्वहीन झालेल्या राष्ट्रवादीतील दोन नगरसेविका व काँग्रेसमधील दोन नगरसेवकांनी रविवारी थेट मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीच्या वाताहतीला तर काँग्रेसमधील गळतीला सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी असलेले मोहन पाटील यांना अंतर्गत विरोध सुरू झाला असला, तरी त्यांनी पक्षाला धीर व नेतृत्व देण्याचा प्रयत्न चालवला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्यात नेतृत्वाच्या बदनामीची चर्चा चांगलीच गाजल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीच्या नगरसेविका वंदना पाटील व अनिता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वंदना या राष्ट्रवादीमध्ये असूनही शिवसेनेच्या कार्यक्रमांस काही महिन्यांपासूनच हजेरी लावत होत्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जवळचे मानले जाणारे नगरसेवक दिनेश नलावडे, राजू वेतस्कर यांनीही शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, उपमहापौर प्रवीण पाटील, स्थायी सभापती प्रभाकर म्हात्रे, नगरसेवक संदीप पाटील, अरविंद ठाकूर, जयंती पाटील, शहरप्रमुख धनेश पाटील, उपशहरप्रमुख शंकर वीरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक सेनेत
By admin | Updated: March 20, 2017 01:59 IST