काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने लढणार
By Admin | Updated: February 4, 2017 03:31 IST2017-02-04T03:31:42+5:302017-02-04T03:31:42+5:30
ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आजी-माजी सहा नगरसेवकांना रिंगणात उतरवले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती लागल्याने बहुतांश ठिकाणी

काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने लढणार
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आजी-माजी सहा नगरसेवकांना रिंगणात उतरवले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती लागल्याने बहुतांश ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मुंब्रा, कळवा यासारख्या परिसरात राष्ट्रवादीसमोर काँग्रेस आणि काँग्रेससमोर राष्ट्रवादी आमनेसामने आहेत.
काँग्रेसने शहराध्यक्ष मनोज शिंदे आणि त्यांच्या भावाला तिकीट दिले आहे. काही जागांचा तिढा सुटत नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसने उमेदवारयादी गुलदस्त्यात ठेवली होती. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी पक्षाने उमेदवारी नक्की झालेल्यांना एबी फॉर्मवाटप केले. सुमारे ६० जागांवर उमेदवारी दिली असून त्यामध्ये ७० टक्के नवे चेहरे आहेत. त्यामुळे ५० टक्के महिला आहेत, असे काँग्रेस शहर सरचिटणीस विजय हिरे म्हणाले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे ८३ अर्ज
- शिवसेना-भाजपाच्या यादीची अखेरपर्यंत वाट पाहत बंडखोरी टाळण्यासाठी व्यूहरचना करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. अगदी अखेरच्या क्षणी शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या नगरसेविका स्रेहा पाटील यांच्यासह सर्वच विद्यमान नगरसेवकांना संधी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी दिली.
यामध्ये हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, मुन्ना बिष्ट, सुहास देसाई, मिलिंद पाटील यांच्यासह विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरेंच्या स्रुषा नीलिमा डावखरे यांनाही संधी देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेतून बंडखोरी करणारे बाळा घाग आणि संगीता घाग अशा ८३ उमेदवारांचा समावेश आहे.