प्रभाग समिती कार्यालयाला काँग्रेसने ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:30+5:302021-02-24T04:41:30+5:30
उल्हासनगर : सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका प्रभाग समिती क्रं. २ च्या कार्यालयाला काँग्रेसने सोमवारी टाळे ठोकले. पाणी, ...

प्रभाग समिती कार्यालयाला काँग्रेसने ठोकले टाळे
उल्हासनगर : सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका प्रभाग समिती क्रं. २ च्या कार्यालयाला काँग्रेसने सोमवारी टाळे ठोकले. पाणी, रस्ते, साफसफाई आदी समस्या सोडवण्याऐवजी भूमाफियांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी कार्यालयाला टाळे ठोकल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.
उल्हासनगर प्रभाग समिती क्रं. २ च्या परिसरातील पाणी, साफसफाई, रस्ते, तुंबलेले नाले आदी समस्यांबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक प्रभाग अधिकारी अनिल खतुरानी यांच्याकडे गेले. मात्र ते भेटत नाही, अशा तक्रारी नागरिकांनी साळवे यांच्याकडे केल्या. साळवे यांनी पक्ष कार्यकर्ता व नागरिकांच्या समस्या सोडवण्याची विनंती खतुरानी यांच्याकडे केली. मात्र या विनंतीला केराची टोपली दाखवित त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकूनही घेतल्या नाहीत. त्यामुळे साळवे यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी दुपारी ३ वाजता खतुरानी यांची खुर्ची बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले.
खतुरानी यांच्या नियुक्तीला नगरसेवकांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच गेल्या आठवड्यात राजकीय दबावाला झुगारून राणा खदान येथील डम्पिंग ग्राउंड येथील आरक्षित भूखंडावरील भल्या मोठ्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई करण्यात आली. या कारवाईने त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र दोन दिवसांनंतर तिथेच बांधकाम ‘जैसे थे’ उभे राहत आहे. या प्रकाराने खतुरानी यांच्यावर पुन्हा टीका होत आहे. खतुरानी यांना सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास वेळ नाही. मग ते बंद कार्यालयात कोणासोबत बसतात, असा प्रश्न साळवे यांनी केला. राहुल गांधी आपणास भेटण्यास येतात का, असा ऊपहास करून खतुरानी यांनी काँग्रेस पक्षाचा अपमान केल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली.
.............
अवैध बांधकामांना सरंक्षण?
महापालिका प्रभाग समिती क्रं-२ मध्ये रस्ते, साफसफाई, पाणीटंचाई, पाणीगळती आदी समस्या निर्माण होऊन नागरिक हैराण झाले. या समस्या सोडविण्याऐवजी राजकीय नेते, भूमाफिया यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या असंख्य अवैध बांधकामांचे संरक्षण करण्याचे काम प्रभाग समितीचे अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचारी करीत असल्याचा आरोप होत आहे.