काँग्रेस ५४, राष्ट्रवादी ४७ जागा लढवणार
By Admin | Updated: February 4, 2017 03:33 IST2017-02-04T03:33:35+5:302017-02-04T03:33:35+5:30
उल्हासनगर पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीची चर्चा झाली होती. मात्र, ही चर्चा पूर्ण न करताच थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

काँग्रेस ५४, राष्ट्रवादी ४७ जागा लढवणार
उल्हासनगर : उल्हासनगर पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीची चर्चा झाली होती. मात्र, ही चर्चा पूर्ण न करताच थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रभागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. शेवटच्या क्षणी जागावाटपाचा घोळ सोडवता न आल्याने दोन्ही पक्षांनी आपापल्या परिने उमेदवारी दाखल करून जास्तीतजास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आघाडीची वाट न पाहताच दोन्ही पक्षांनी आपले सर्व उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
सर्वच पक्षांनी निष्ठावंतांना डावलून प्रस्थापितांना उमेदवारी दिली असून बहुचर्चित ओमी कलानींसह आठ जण राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर, तर टीमचे २८ सदस्यांनी भाजपाच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजपा व ओमी टीमचा ४२ व ३६ असा फॉर्म्युला ठरला. रिपाइं आठवले गटाला त्यांनी ठेंगा दाखवला असून ओमी कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जागावाटपाचा घोळ न सुटल्याने त्यांनी आपापल्या इच्छुक उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन थेट अधिकृत उमेदवारी देऊ केली. ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीने काही जागा काँग्रेससाठी, तर काँग्रेसने काही जागा राष्ट्रवादीसाठी सोडल्या आहेत. मात्र, बहुसंख्य ठिकाणी तोडगा न निघाल्याने काँगे्रस आणि राष्ट्रवादी यांनी परस्परविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादीने एकूण ४७ उमेदवारांना, तर काँग्रेसने ५४ उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. यासोबत मातंग समाज, स्वाभिमान संघटना आणि लहुजी सेना यांनादेखील काही जागा सोडल्या आहेत. आघाडीबाबतची अंतिम चर्चा करून जागावाटप निश्चित करण्यास शेवटच्या क्षणी वेळ न मिळाल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांची वाट न पाहताच परस्पर उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
वरवर आघाडी बोलले जात असले तरी अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाल्याने नक्की आघाडी झाली की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपला सोबत घेण्यात अपयश आले आहे. त्यामुळे निळ्या झेंड्याशिवाय आघाडीच्या दोन्ही पक्षांना निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
बीएसपीचे २२ उमेदवार रिंगणात
या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १, २, ३, ७, ८, ११, १३, १४ आणि १८ या पॅनलमधून २२ उमेदवार बीएसपीने निवडणूक रिंगणात
उतरवले आहेत, अशी माहिती बीएसपीचे महाराष्ट्र प्रभारी प्रशांत इंगळे यांनी दिली.
भारिपतर्फे १५ उमेदवार रिंगणात
भारिप बहुजन महासंघाने १५ उमेदवार उल्हासनगरमध्ये रिंगणात उतरवले आहेत. आघाडीची चर्चा रंगत असताना भारिप स्वबळावर लढणार आहे. (प्रतिनिधी)
मनसेतर्फे २७ उमेदवार
मनसेच्या वतीने या निवडणुकीत एकूण २७ उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. मनसे स्वबळावर ही निवडणूक लढवत असल्याने १२ पॅनलमधून हे २७ उमेदवार उभे केले आहेत.
या २७ उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. ठरावीक पॅनलवर लक्ष केंद्रित करून ही उमेदवारी दिल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी स्पष्ट केले.
ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडलेल्या जागांवर आपले उमेदवार दिलेले नाहीत. मात्र, ज्या ठिकाणी निर्णय झाला नाही, अशा प्रभागांत राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
- प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस
आघाडीची चर्चा झालेली होती. मात्र, काही जागांवर दोन्ही पक्षांचा दावा होता. त्यामुळे त्या जागेवर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. काँग्रेसने आपल्या परिने जास्तीतजास्त चांगले उमेदवार दिलेले आहेत. काँग्रेसने इतर समाजालाही काही जागा सोडून त्यांना सोबत जोडण्याचे काम केले आहे.
-जयराम लुल्ला, उल्हासनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष