मरिना बे, साबरमतीचा संगम
By Admin | Updated: December 24, 2016 03:12 IST2016-12-24T03:12:33+5:302016-12-24T03:12:33+5:30
काही दिवसांपूर्वी रेतीबंदरची खाडी अतिक्रमणमुक्त केल्यानंतर आता पालिका त्या ठिकाणी पारसिक चौपाटी विकसित करणार

मरिना बे, साबरमतीचा संगम
ठाणे : काही दिवसांपूर्वी रेतीबंदरची खाडी अतिक्रमणमुक्त केल्यानंतर आता पालिका त्या ठिकाणी पारसिक चौपाटी विकसित करणार आहे. सिंगापूरच्या मरिना बे आणि गुजरातच्या साबरमती नदीचा संगम करून पालिकेने पारसिक चौपाटीचा मास्टर प्लान तयार केला आहे. त्यानुसारच, आता येत्या जून महिन्यापर्यंत प्रत्यक्षात ही चौपाटी आकार घेणार असल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या चौपाटीसाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित असून वॉटर फ्रण्ट डेव्हलपमेंटमधील टप्पा क्रमांक-११ हा पारसिक खाडीकिनारा असून तो आता विकसित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेने नुकताच मंजूर केला. त्यानुसार, आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिल्या आर्थिक वर्षात ५ आणि पुढील आर्थिक वर्षात २० कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही जागा महसूलची असून त्यांनी चौपाटी विकसित करण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. आता लेखी मान्यता घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र किनारपट्टी विकास प्राधिकरणाकडून मान्यता घेण्याचे कामही अंतिम टप्प्यात असून सीआरझेडचे कुठेही उल्लंघन होणार नाही, त्या अनुषंगानेच ही चौपाटी विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला जवळपास सर्वच परवानग्या मिळाल्या आहेत. या प्रकल्पात कोणत्याही अडचणी आल्या नाही, तर आगामी जून महिन्यापर्यंत ही चौपाटी पूर्ण होईल, असे मत महापौर संजय मोरे यांनी या वेळी व्यक्त केले.
ती विकसित करण्यासाठी सिंगापूरमधील मरिना बे आणि गुजरातमधील साबरमती येथे विकसित केलेल्या चौपाट्यांचा अभ्यास केला असून त्या दोघांचा संगम करून या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीचा मास्टर प्लान तयार केला आहे. (प्रतिनिधी)