उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली
By Admin | Updated: November 15, 2016 04:39 IST2016-11-15T04:39:51+5:302016-11-15T04:39:51+5:30
घराच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘बिल्वदल’वासीयांनी गुरुवारपासून छेडलेले बेमुदत उपोषण अविरतपणे सुरूच आहे. सोमवारी उपोषणकर्त्यांपैकी तीन

उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली
डोंबिवली : घराच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘बिल्वदल’वासीयांनी गुरुवारपासून छेडलेले बेमुदत उपोषण अविरतपणे सुरूच आहे. सोमवारी उपोषणकर्त्यांपैकी तीन महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारार्थ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात एक ७५ वर्षांची वृद्धाही आहे. केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांनी उपोषणाची दखल न घेतल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, रहिवासी उपोषण सोडत नसल्याने पोलीस यंत्रणेची पुरती दमछाक झाली आहे.
केडीएमसी आणि इमारतमालकाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ पूर्वेकडील इंदिरानगर चौकात बिल्वदल इमारतीतील रहिवाशांनी बेमुदत उपोषण छेडले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शनिवारी सूतिकागृह व शास्त्रीनगर रुग्णालयाचा दौरा करून तेथील दुरवस्थेची पाहणी केली. त्या वेळी त्यांच्यासोबत आयुक्त ई. रवींद्रन आणि अतिरिक्त आयुक्त संजय घरत हेदेखील उपस्थित होते. या दौऱ्यानंतर खासदार आणि महापौरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी रवींद्रनदेखील भेट देतील, अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांना होती. परंतु, ते न फिरकल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे सोमवारी सकाळी कस्तुरी चौधरी (वय ७५), वंदना चौधरी आणि गुणावती जतन यांची प्रकृती बिघडली. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने अखेर महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. (प्रतिनिधी)