उल्हासनगर महापालिकेच्या वर्धापन दिनाची सांगता; सायकल रैलीसह इनडोअर गेमचे आयोजन
By सदानंद नाईक | Updated: October 21, 2023 18:46 IST2023-10-21T18:46:10+5:302023-10-21T18:46:29+5:30
महापालिकेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त सायकल रैलीसह इनडोअर गेमसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

उल्हासनगर महापालिकेच्या वर्धापन दिनाची सांगता; सायकल रैलीसह इनडोअर गेमचे आयोजन
उल्हासनगर : महापालिकेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त सायकल रैलीसह इनडोअर गेमसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी तरण तलाव येथे सांस्कृतिक व पारितोषिक कार्यक्रमानंतर वर्धापनदिनाची सांगता करण्यात आली.
उल्हासनगर महापालिकेच्या स्थापनेला २७ वर्ष झाल्याचा निमित्ताने, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी व शनिवारी असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शुक्रवारी सकाळी शांतीनगर वेलकम गेट ते साईबाबा मंदिर डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार पर्यंत सायकल रैलीचे आयोजन केले. रैलीला आमदार कुमार आयलानी व आयुक्त अजीज शेख यांनी हिरवा झेंडा दाखविला. तर दुपारी महापालिकेच्या तरण तलाव येथे कॅरम स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा, लिंबू चमचा संगीत खुर्ची आदी स्पर्धेचे आयोजन करून महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
महापालिका वर्धापनदिनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी तरण तलाव येथे सांगता कार्यक्रम होऊन सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी विकास कामाचा आढावा घेतला. एकीकडे स्थापना होत असतांना दुसरीकडे, कोट्यवधीचा निधी खर्च करूनही शहरात पाणी टंचाई, सर्वत्र कचऱ्याचे ढीग व दुर्गंधी, रस्त्याची दुरावस्था, २०० बेडचे रुग्णालय उदघाटनाच्या प्रतिक्षेत असतांना, त्याचे खाजगीकरण, महापालिकेत घोटाळ्याची मालिका, अवैध बांधकामांचा सुळसुळाट, शहर विकासाचे कामे ठप्प असल्याचे चित्र आहे.