निवडणुकीसाठी मनसेला सतावतेय निधीची चिंता
By Admin | Updated: April 24, 2017 02:08 IST2017-04-24T02:08:47+5:302017-04-24T02:08:47+5:30
भिवंडी महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होणार असल्याचे जाहीर झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार घडामोडी सुरू

निवडणुकीसाठी मनसेला सतावतेय निधीची चिंता
अनगाव : भिवंडी महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होणार असल्याचे जाहीर झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार घडामोडी सुरू झाल्या आहेत. मात्र, मनसेमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. निवडणुकीसाठी पक्षाकडून निधी दिला जातो. पण, मनसेकडून निधी मिळत नसल्याने स्थानिक नेते तो कसा उभा करायचा, याचा विचार करत आहेत. दरम्यान, दोन ते तीन दिवसांत निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
शहरातील पक्षाची स्थिती, निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढवायची, याबाबत शनिवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. यात प्रामुख्याने निवडणुकीसाठी निधी कसा उभारायचा, यावर अधिक भर देण्यात आला. जर पक्षाने उमेदवारांसाठी निधी दिला, तर नव्वदपेक्षा अधिक इच्छुक मनसेकडून निवडणूक लढवतील, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. या बैठकीला जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. यात जिल्हाध्यक्ष मदन पाटील, शहराध्यक्ष अफसर खान, प्रदीप बोडके उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये मनसेचे इंजीन सायडिंगला गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. त्यातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नुकतीच पदाधिकारी, नेत्यांची बैठक झाली. त्यात काहींनी नेत्यांवर तोंडसुख घेतले. दरम्यान, मनसेने यापूर्वीच स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी भिवंडीला कसे बकाल केले, भ्रष्टाचार हा प्रचारातील प्रमुख मुद्दा असेल, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मनसेने शहरातील समस्यांविरोधात धरणे आंदोलन केले होते. खासकरून पाणीटंचाईवर महिलांनी थाळीनाद केला होता. त्यानंतर, आयुक्तांनी १५ जलकुंभांचे काम हाती घेतले. मनसेला निवडून दिल्यास आम्ही शहराचा विकास त्याचबरोबर पारदर्शक कारभार करू, अशी ग्वाही स्थानिक नेत्यांनी दिली आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हा पक्षाचा अजेंडा असेल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मदन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनाही प्रचारासाठी बोलवण्याच्या दृष्टीने आजच्या बैठकीत विचारविनिमय झाला, असेही पाटील यांनी नमूद केले. (वार्ताहर)