भाईंदरमध्ये ‘द्या आणि घ्या’ संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:16 AM2019-01-30T00:16:02+5:302019-01-30T00:16:34+5:30

स्थानिक रहिवाशी प्रदीप धानुका यांनी भाईंदर पोलिसांच्या सहकार्याने नुकतीच ‘द्या आणि घ्या’ या तत्त्वावर आधारित ‘नेकी की दीवार’ संकल्पना सुरू केली आहे

Concept of 'Give and Take' in Bhayander | भाईंदरमध्ये ‘द्या आणि घ्या’ संकल्पना

भाईंदरमध्ये ‘द्या आणि घ्या’ संकल्पना

Next

भाईंदर : येथील स्थानिक रहिवाशी प्रदीप धानुका यांनी भाईंदर पोलिसांच्या सहकार्याने नुकतीच ‘द्या आणि घ्या’ या तत्त्वावर आधारित ‘नेकी की दीवार’ संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेनुसार ज्यांच्याकडे विनावापराच्या वस्तू आहेत ते त्या वस्तू एका निश्चित ठिकाणी ठेवतील, ज्यांना त्या वस्तूची गरज आहे ते त्या वस्तू त्या ठिकाणाहूनच घेतील, असा उद्देश त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

ते लायन्स क्लब ऑफ मीरा-भाईंदर गॅलेक्सीचे वरिष्ठ सदस्य असून ते लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत करत असतात. या सततच्या मदतीला एक वेगळी जोड देण्याचा विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. अखेर त्यांना ‘गीव अ‍ॅन्ड टेक’ ही संकल्पना आठवली. त्याच धर्तीवर त्यांनी ‘द्या आणि घ्या’ अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. त्याला माणुसकीची जोड देत ‘नेकी की दीवार’ असे नाव दिले. त्यासाठी जागेची अडचण त्यांच्यापुढे उभी राहिली. ती जागा त्यांना भाईंदर पोलिस ठाण्याच्या आवारात दिसली. मात्र त्यासाठी पोलीस सहकार्य करतील का, असा प्रश्न सतावत होता. मग त्यांनी थेट सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्यापुढे ‘द्या आणि घ्या’ ची संकल्पना मांडली. कुलकर्णी यांना संकल्पना पटल्याने त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यातील एका कोपऱ्यातील भिंतीवर लाकडी कपाट बसविण्यास धानुका यांना परवानगी दिली. धानुका यांनी तेथे सुमारे १० फूट उंच व ५ फूट रुंदीचे तीन खणांचे लाकडी कपाट बसविले. त्यात ज्यांच्याकडे विनावापराच्या अथवा अडगळीतील वस्तू ज्यांना नको असल्यास त्यांनी त्या वस्तू त्या कपाटात आणून ठेवायच्या आहेत.

नागरिकांचा चांगला प्रतिसाद
उपक्रमाला दोनच दिवसांपूर्वी सुरूवात केली असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे धानुका यांनी सांगितले. विनावापराच्या वस्तू ज्यांना भंगारात विकायच्या नसल्यास त्यांनी त्या येथे ठेवाव्यात असे आवाहन केले. येथील वस्तू विनामूल्य घेऊन जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील आणखी काही ठिकाणी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

Web Title: Concept of 'Give and Take' in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.