मंडपाच्या आचारसंहितेचे पालन मॅरेथान स्पर्धेपासून
By Admin | Updated: August 21, 2015 23:40 IST2015-08-21T23:40:58+5:302015-08-21T23:40:58+5:30
उत्सवादरम्यान रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या मंडपासाठी नवी आचारसंहिता म्हणजे सुधारित धोरण ठाणे महापालिकेने तयार केले आहे. या धोरणानुसार

मंडपाच्या आचारसंहितेचे पालन मॅरेथान स्पर्धेपासून
ठाणे : उत्सवादरम्यान रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या मंडपासाठी नवी आचारसंहिता म्हणजे सुधारित धोरण ठाणे महापालिकेने तयार केले आहे. या धोरणानुसार एक चतुर्थांश जागेत मंडप उभारणीला परवानगी देण्यात येणार आहे. परंतु, महासभेने पालिकेच्या या धोरणावर टीका केली असली तरी या धोरणाची अंमलबजावणी पालिका येत्या रविवारच्या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेपासूनच करणार आहे. विशेष म्हणजे ठाणेकरांनी हे धोरण आपलेसे करावे म्हणूनच पालिकेने स्वत:पासून ही सुरुवात केली आहे.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच गुरुवारी झालेल्या महासभेत पालिकेने नवे सुधारित धोरण मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. परंतु, त्या धोरणाच्या विरोधात नगरसेवक उतरल्याने पालिका आयुक्तांनी सभेतून काढता पाय घेतला. त्यानंतर, त्यांनी रात्री उशिरा पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचा मंडप हा धोरणाच्या म्हणजेच आचारसंहितेच्या अधीन राहून उभारण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत.
मंडप उभारण्यासाठी कुठेही खड्डे खोदू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, वाहतूककोंडी होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार, पालिका मुख्यालयासमोर रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेला मॅरेथॉन स्पर्धेचा मंडप हा एक चतुर्थांश जागेत उभारण्यात आल्याचा दावा महापालिकेचे माहिती जनसपंर्क अधिकारी संदीप माळवी यांनी केला आहे.
तसेच रस्त्यात उभारण्यात आलेल्या कमानीसुद्धा हटविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या धारेणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.
एकूणच या धोरणाची सुरुवात स्वत:पासून पालिकेने केल्याने आता येत्या गोविंदा उत्सव
आणि गणेशोत्सव काळात उभारण्यात येणाऱ्या मंडपांवर संक्रांत ओढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
(प्रतिनिधी)