पालिकेच्या स्टारग्रेड अॅपवर तक्रारींचा पाऊस
By Admin | Updated: July 27, 2015 23:00 IST2015-07-27T23:00:31+5:302015-07-27T23:00:31+5:30
एक महिना रखडलेल्या महापालिकेच्या खड्डयांच्या तक्रारीसाठी असलेल्या स्टारग्रेड अॅपचा अखेर शनिवारी शुभारंभ झाला आणि या अॅपवर तक्रारींचा पाऊस पडण्यास सुरवात झाली.

पालिकेच्या स्टारग्रेड अॅपवर तक्रारींचा पाऊस
- अजित मांडके, ठाणे
एक महिना रखडलेल्या महापालिकेच्या खड्डयांच्या तक्रारीसाठी असलेल्या स्टारग्रेड अॅपचा अखेर शनिवारी शुभारंभ झाला आणि या अॅपवर तक्रारींचा पाऊस पडण्यास सुरवात झाली. यामध्ये सोमवार पर्यंत ६० तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये ३३ तक्रारी या फेक आहेत. तर इतर विभागांच्याही तक्रारींचा यात समावेश आहे. परंतु शहरात खड्डे नाहीत, असा दावा करणाऱ्या ठाणे महापालिकेचा हा दावा मात्र या अॅपने खोटा ठरविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजविण्यासाठी सर्तक झाला आहे. सर्वाधिक ०७ खड्डे हे माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीत आहेत.
शनिवारी सकाळी या अॅपचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ठाणेकर नागरीकांनी हे अॅप डाऊनलोड करण्यास सुरवात केली असून आतापर्यंत ३८६ ठाणेकरांनी हे अॅप डाऊनलोड केले असल्याची माहिती महापालिकेच्या संगणक विभागाने दिली आहे. तसेच आतापर्यंत यावर ६० तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये ३३ तक्रारी या फेक असल्याची माहिती या अॅपवर काम करणाऱ्या विभागाने दिली असून काही तक्रारी या कचऱ्याच्या संदर्भातील असून, त्या देखील संबधींत विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. काही रस्त्यांच्या बाबतीत तक्रारी आल्या असल्या तरी ते रस्ते महापालिकेकडे नसून इतर यंत्रणांकडे असल्याने त्या तक्रारींची दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये एमएमआरडीए विभागाशी संबधीत तक्रारीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.