उपमहापौरांविरोधातच तक्रार
By Admin | Updated: March 21, 2017 01:57 IST2017-03-21T01:57:06+5:302017-03-21T01:57:06+5:30
भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप असलेल्या मोरेश्वर भोईर यांना भाजपाने उपमहापौरपद दिले आहे. हे कोणत्या न्यायात बसते.

उपमहापौरांविरोधातच तक्रार
कल्याण : भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप असलेल्या मोरेश्वर भोईर यांना भाजपाने उपमहापौरपद दिले आहे. हे कोणत्या न्यायात बसते. हाच भाजपाचा पारदर्शी कारभार आहे का, असा सवाल भाजपाचे उत्तर भारतीय आघाडीचे माजी कल्याण अध्यक्ष व मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश सिन्हा यांनी केला आहे. भोईर यांची पक्षाने हाकालपट्टी करावी, अशी मागणी सिन्हा यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या मुद्यावरून भाजपात मराठीविरुद्ध उत्तर भारतीय, असे राजकारण रंगले आहे.
पिसवली गावात २००८ मध्ये ओमप्रकाश दुबे व मयूर दुबे यांची हत्या करण्यात आली. ते दोघेही भाजपाचे ग्रामीण उपाध्यक्ष जय दुबे यांचे भाऊ होत. पंचायत समितीच्या उमेदवारी मिळवण्याच्या वादातून दुबे बंधूंची हत्या झाली होती. हत्या प्रकरणाचा आरोप भोईर यांच्यावर आहे. २००८ मध्ये भोईर हे मनसेत होते. त्यानंतर, ते भाजपामध्ये आले. भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप असलेल्या भोईर यांना उपमहापौरपद देणे कितपत योग्य आहे. त्यामुळे उत्तर भारतीय समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भोईर यांना पदावरून न हटवल्यास उत्तर भारतीय समाजाला भाजपाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा सिन्हा यांनी दिला आहे.
दरम्यान, उपमहापौर भोईर यांनी सांगितले की, दुबे हत्या प्रकरण हे वैयक्तिक होते. ते न्यायप्रविष्ट आहे. या हत्या प्रकरणात माझा भाऊही मारला गेला. ही बाजू लपवून ठेवली जाते. पिसवली ६० टक्के उत्तर भारतीयांची वस्ती आहे. याच गावातून २००९-१० मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माझे पॅनल निवडून आले. त्यानंतर, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्या वेळी उत्तर भारतीयांनी मला मतदान केले आहे. मी उत्तर भारतीयांविरोधात असतो, तर मला त्यांनी निवडूनच दिले नसते. राजकीय रंग देऊन उत्तर भारतीयविरुद्ध मराठी असा वाद पुन्हा उकरून काढला जात आहे. (प्रतिनिधी)