ठाणेकरांचा मास्कविना बिनधास्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:45+5:302021-02-24T04:41:45+5:30
ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले असताना शहरात मात्र बहुतांशी लोक हे मास्कविना फिरत असल्याचे ...

ठाणेकरांचा मास्कविना बिनधास्त संचार
ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले असताना शहरात मात्र बहुतांशी लोक हे मास्कविना फिरत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन टाळायचे असेल, तर मास्क वापरा, अशी सूचना सरकारने केली असली तरी शहरात तिचे पालन करताना ठाणेकर दिसत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन नको असेल, तर नियम पाळा, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील जनतेला केले. विदर्भातील काही जिल्ह्यासह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले, तसेच सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर काही दिवस बंदीदेखील घातली आहे. पुढील ८- १० दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही ठाणे शहरात भाजी मार्केट असो वा इतर सार्वजनिक ठिकाणी वावरताना ठाणेकर मास्कचा वापर करत नाहीत, तसेच मास्क घातला असेल तरी तो तोंडाऐवजी हनुवटीला, गळ्याला अडकवून चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवस शहरात फेरफटका मारला असता मास्कविना लोक फिरत असल्याचे पाहायला मिळाले.