खड्डे, साचणाऱ्या पाण्याचा अभ्यास करण्यासाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 02:17 AM2019-10-23T02:17:31+5:302019-10-23T06:23:44+5:30

आयुक्तांचे आदेश, जपानच्या तंत्रज्ञानाचीही घेणार माहिती

Committee for the study of pits, stagnant water | खड्डे, साचणाऱ्या पाण्याचा अभ्यास करण्यासाठी समिती

खड्डे, साचणाऱ्या पाण्याचा अभ्यास करण्यासाठी समिती

googlenewsNext

ठाणे : पावसाळ्यात दरवर्षी शहरातील ठराविक २० ते ३० रस्त्यांवर खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या रस्त्यांच्या बांधणीत प्रगत राष्ट्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कायमचा तोडगा कसा काढता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. दरम्यान, रस्त्यांची डागडुजी, तलावांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करून ठाणेकरांची दिवाळी तेजोमय करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी केले.

महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आयुक्तांनी विविध कामांचा आढावा घेवून विकास योजनेतंर्गत रस्ते आणि ज्या ठिकाणी रस्ते रूंदीकरणाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी दिवाळी संपताच कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, समीर उन्हाळे तसेच महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी एकात्मिक नाले विकास, सिमेंट काँक्रीटीकरण, विकास आराखड्यातील रस्त्यांचे नुतनीकरण, युटीडब्लूटी पद्धतीने रस्त्यांची कामे, मॉडेल रस्ते आदी महत्वाच्या रस्त्यांची कामे करताना प्रगत राष्ट्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून नावीन्यपूर्ण रस्ते कसे बनविता येतील यांचा अभ्यास करण्यास सांगितले आहे.

शहरातील ठराविक २० ते ३० रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात, तसेच मोठ्या प्रमाणात पाणीही साचते. बहुतांश प्रगत देशांमध्ये सर्वत्र डांबरी रस्ते असूनदेखील ते रस्ते खड्डेविरहीत असतात. हे रस्ते बांधताना कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ठाणे शहरात व्यावहारीकदृष्ट्या अशा पद्धतीचा वापर करून शहर खड्डेमुक्त करता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवर तज्ज्ञांचा समावेश असणारी एक समिती गठन करण्यात येणार आहे.

जपानमध्ये पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये म्हणून रस्त्याच्या खाली बोगदा तयार करण्यात आला असून यामध्ये पावसाचे पाणी साठवून त्याचा पुनर्वापर केला जातो. ठाणे शहरात रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी अशा कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, याचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठन करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीनिहाय अनाधिकृत बांधकामे, लेडीज बार, फुटपाथ अतिक्र मण यांची माहिती घेण्यात येणार असून दिवाळी संपताच सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांच्या विशेष पथकामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहेत.

रस्ता रुंदीकरणासाठी विशेष मोहीम

शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. तो लक्षात घेता शहरात पुन्हा रस्ते रुंदीकरण मोहीम सुरु करण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी घेतला. त्यासाठी शहरातील रस्त्यांलगत असलेल्या बाधित बांधकामांवर कारवाईही करण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरातील प्रमुख रस्ते, चौक, महत्वाची ठिकाणे, इमारती आदी परिसरातील रस्त्यांची डागडुजी, साफसफाई, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई तसेच तलावांचे सुशोभीकरण आदी कामे करून दिवाळीमध्ये ठाणे शहराचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Web Title: Committee for the study of pits, stagnant water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.