ठाण्यात आयुक्तांचा करिष्मा भाजपाच्या कामी आलाच नाही
By Admin | Updated: February 24, 2017 07:09 IST2017-02-24T07:09:53+5:302017-02-24T07:09:53+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने महापालिकेतील भ्रष्टाचाराबरोबर महापालिका आयुक्त संजीव

ठाण्यात आयुक्तांचा करिष्मा भाजपाच्या कामी आलाच नाही
अजित मांडके / ठाणे
महापालिकेत शिवसेनेने घोटाळे केले, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभांमध्ये केला. त्याखेरीज, भाजपाकडे स्वत:ची म्हणून दाखवण्यासारखी कामे नसल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेली कामे हीच आपली कामे असल्याचा प्रचार भाजपाने केला. आयुक्तांना राजकारणात ओढून नोकरशाहीवर चिखलफेक करण्याची संधी शिवसेनेला दिली. मात्र, आयुक्तांची प्रतिमा भाजपाच्या कामी आली नाही. भाजपा शिवसेनेच्या रणनीतीपुढे कमीच पडल्याचे दिसून आले. भाजपाकडे एकच जमेची बाजू दिसून आली, ती म्हणजे विधानसभेत शहरात मिळालेले यश पालिकेच्या निवडणुकीतही टिकवून ठेवल्यामुळेच भाजपाला २३ जागा मिळवता आल्या.
भाजपाच्या मागील निवडणुकीच्या तुलनेत १५ जागा वाढल्या असल्या, तरी यामध्ये आयारामांच्या १० जागांचा समावेश आहे. याच आयारामांच्या जोरावर कल्याण-डोंबिवली पॅटर्न करून सत्तेत सहभागी होण्याचे स्वप्नही भाजपाने पाहिले होते. भाजपाच्या रणनीतीनुसार त्यांनी ३५ जागांचा दावा केला होता. आयुक्तांना आम्हीच ठाण्यात पाठवले असल्याच्या प्रचाराचे चांगले परिणाम होण्याऐवजी उलट परिणाम झाल्याचे दिसून आले. रस्ता रुंदीकरण, रस्त्यावरील बाधित घरे, बार, लॉजवरील कारवाई, व्यापाऱ्यांचे बाधित झालेले गाळे या साऱ्याला भाजपाच जबाबदार असल्याचे वातावरण मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर तयार झाले. याशिवाय, मतदानाच्या आदल्या दिवशीदेखील मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात येऊन ठाण्याची तुलना रावणाच्या लंकेशी केली, तसेच आयारामांचा उल्लेख बिभीषण असा केल्याने त्याचेही विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
भाजपाला नौपाडा, जुने ठाणे, टेंभीनाका, घोडबंदरचा एक वॉर्ड या परिसराने हात दिला. विधानसभेत ठाणे शहर मतदारसंघावर भाजपाचा झेंडा फडकला होता. त्याचे वातावरण पोषक करून भाजपाला येथे वर्चस्व मिळवता आले आहे. वागळे पट्ट्यात संजय घाडीगावकर यांना घेऊन पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा डाव भाजपाच्या चांगलाच अंगलट आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. याला जबाबदार घाडीगावकर हेच असल्याचे दिसत आहे. आपल्या समर्थकांना तिकीट मिळत नसल्याने त्यांनी भाजपा सोडण्याचे केलेले नाट्य आणि नंतर पुन्हा भाजपाच्या तिकिटावर लढवलेली निवडणूक यामुळे याचा परिणाम होऊन भाजपाला वागळे पट्ट्यात सपाटून मार खावा लागला.