व्यावसायिकांचे पाणी महागले
By Admin | Updated: February 19, 2016 02:26 IST2016-02-19T02:26:28+5:302016-02-19T02:26:28+5:30
एकीकडे अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे भीषण पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे व्यावसायिकांच्या पाणीदरात वाढ करण्याच्याप्रस्तावाला गुरुवारी कल्याण-डोंबिवलीच्या स्थायी समितीने मान्यता दिली.

व्यावसायिकांचे पाणी महागले
कल्याण : एकीकडे अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे भीषण पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे व्यावसायिकांच्या पाणीदरात वाढ करण्याच्याप्रस्तावाला गुरुवारी कल्याण-डोंबिवलीच्या स्थायी समितीने मान्यता दिली. घरगुती
दरवाढ झाली नसली तरी जादा पाण्याचा वापर केल्यासही ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव शनिवारच्या महासभेत सादर केला जाणार आहे.
केडीएमसी क्षेत्रात प्रतिदिन सरासरी ३०० द.ल. लीटर पाणीपुरवठा केला जातो. बारावे व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांव्यतिरिक्त जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मोहिली आणि नेतिवली येथे जलशुद्धीकरण केंद्रासाठी झालेला खर्च आणि पाणीपुरवठ्यात झालेली वाढ, त्याचबरोबर विद्युतदेयके, देखभाल दुरुस्ती, लागणारी रसायने, पाण्याची रॉयल्टी आदी खर्चांत वाढ झाली आहे. त्याचबरोबर दैनंदिन देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
घरगुती ग्राहकांच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. जर, त्यांनी जादा पाणी वापरले तरच त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. त्यामुळे यातून पाण्याचा अतिरिक्त वापर टाळला जाईल आणि पाण्याची बचत होईल, याकडे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी लक्ष वेधले. काही सदस्यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. परंतु, चर्चेअंती प्रशासनाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. साधारणपणे घरगुती ग्राहकांना ५०० लीटर पाण्यासाठी प्रतिघनमीटर ७ रुपये दर आकारला जातो.