ठाणे - मुंब्य्रातील वीज समस्येच्या मुद्यावरुन स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याना उद्या जाळपोळ झाली किंवा तुमच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले गेले तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीच असाल असा धमकी वजा इशारा दिला असतांनाच, मंगळवारी राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पुढील दोन दिवसात वीजेची समस्या निकाली काढली गेली नाही तर जेल भरो आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला. महावितरणने वीज टंचाई निर्माण होत असल्याने राज्यभर भारनियमन सुरु केले आहे. हे भारिनयमन सुमारे ६ ते ७ तासांचे आहे. त्याव्यतिरिक्त मुंब्रा भागात अतिरिक्त ७ ते ८ तासांचेही भारिनयमन केले जात आहे. त्यामुळे मुंब्रा शहर हे सुमारे १२ ते १४ तास अंधारात असते. परिणामी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी महावितरणच्या मुख्य अधिकारी पुष्पलता चव्हाण यांना फोन करुन नुकताच या संदर्भात दूरध्वनी केला होता. यावेळी त्यांनी मुंब्य्रातील वीज समस्येबाबत त्यांच्याशी चर्चा केली. आमची सहनशिलता संपली आहे, त्यामुळे उद्या जाळपोळ झाली किंवा तुमच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले गेले तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीच असाल असा इशारा दिला आहे. तसेच वीज समस्येचा नाहक त्रास येथील नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यात तुमचे हुंडेगिरी हे अधिकारी साधा फोन सुध्दा घेत नाहीत, त्यामुळे वीजेची समस्या तत्काळ सुटली नाही तर उद्या जे काही घडेल त्याला आपणच जबाबदार असाल असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर मंगळवारी शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक शानू पठाण, सिराज डोंगरे, आशिरन राऊत, राजन किणी, अनिता किणी आदींच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता हुंडेकरी यांची भेट घेतली. यावेळी परांजपें यांनी महावितरण कंपनीला भारिनयमनाबद्दल जाब विचारला. नवरात्रोत्सवाच्या काळात सायंकाळी ७ ते १० या वेळेत भारिनयमन करू नये, एमआयडीसीकडून ज्या वेळेत पाणी सोडण्यात येत, त्यावेळेत भारिनयमन करण्यात येऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच, महावितरण कडे सुमारे ५ हजार लोकांनी नवीन वीज जोडणीसाठी शुल्क अदा केले आहे. मात्र , केवळ मीटर नसल्याने जोडण्या देण्यात आलेल्या नाहीत, त्या जोडण्या तत्काळ देण्यात याव्यात, अशीही मागणी यावेळी परांजपे यांनी केली. तसेच, या मागण्यांच्या संदर्भात आगामी दोन दिवसात मार्ग न काढल्यास जेल भरो आंदोलन करण्यात येईल , असा इशारा यावेळी कार्यकारी अभियंता हुंडेकरी यांना देण्यात आला.
मुंब्य्रातील वीज समस्येवरुन आ. आव्हाडांनी दिला महावितरणच्या अधिकाऱ्याला इशारा, वीज समस्या न सोडविल्यास जलभरो करण्याचा राष्ट्रवादीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:13 IST
मुंब्य्रातील वीज सम्यसेबाबत आमदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धमकी वजा इशारा दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
मुंब्य्रातील वीज समस्येवरुन आ. आव्हाडांनी दिला महावितरणच्या अधिकाऱ्याला इशारा, वीज समस्या न सोडविल्यास जलभरो करण्याचा राष्ट्रवादीचा इशारा
ठळक मुद्देजाळपोळ झाल्यास महावितरण असेल जबाबदारनवरात्रोत्सवात भारनियमन करु नये