‘अपघातमुक्त ठाणे जिल्हा’ संकल्पनेसाठी एकत्रित या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST2021-09-02T05:27:33+5:302021-09-02T05:27:33+5:30
ठाणे : जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे. तसेच अपघातमुक्त ठाणे जिल्हा हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात ...

‘अपघातमुक्त ठाणे जिल्हा’ संकल्पनेसाठी एकत्रित या
ठाणे : जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे. तसेच अपघातमुक्त ठाणे जिल्हा हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी बुधवारी येथे केले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक बुधवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, हेमांगिनी पाटील आदी उपस्थित होते. तर आमदार गणपत गायकवाड, कुमार आयलानी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार आदी यावेळी उपस्थित होते.
सामान्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, अपघाती मृत्यूदर कमी करणे आदी विषयांवर चर्चा करून यासंबंधी काय नाविन्यपूर्ण उपाय आपण करू शकतो, याबाबतचे मार्गदर्शन करून पाटील म्हणाले की, ठराविक महिन्यात तसेच ठराविक वेळातच जास्त अपघात का होतात, याचे विश्लेषण करावे. तसेच नागरिकांमध्ये नियम पाळण्यासंदर्भाची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. ब्लॅक स्पॉट कमी करून ठाणे जिल्हा झिरो टॉलरन्स सेफ रोड महाराष्ट्र करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग हे ठाणे जिल्ह्यातून जातात. रस्ते सुरक्षाविषयक कामामध्ये जिल्ह्याने गेल्या वर्षी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील काळातही यापेक्षा अधिक चांगले काम केले जावे. रस्ते सुरक्षासंबंधी ज्या उपाययोजना राबविल्या जातात, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार गायकवाड आणि आयलानी यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या.