कोरोनाचा निगेटिव्ह बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST2021-05-19T04:41:48+5:302021-05-19T04:41:48+5:30

ठाणे : कोरोना रुग्णांचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या (वागळे इस्टेट) ...

Cocoa's negative fake report racket exposed | कोरोनाचा निगेटिव्ह बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

कोरोनाचा निगेटिव्ह बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

ठाणे : कोरोना रुग्णांचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या (वागळे इस्टेट) पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अफसर तेजपाल मंगवाना या वॉर्डबॉयला मंगळवारी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

अवघ्या बाराशे रुपयांमध्ये ठाणे महापालिकेच्या टेंभीनाका येथील वाडिया रुग्णालयात कोरोना रुग्णांचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्या आधारे तसेच असाच एक बनावट आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट देताना मंगवाना याला या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याची या प्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

* खासगी चाचणी केंद्रातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देण्याच्या घटनेनंतर असेच बनावट रिपोर्ट तयार करून देणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती ठाण्यातील एका समाजसेवकास मिळाली होती. त्याची खातरजमा करून त्याने कोरोनाचे आधी पॉझिटिव्ह असलेल्या काही रिपोर्टचे नंतर बनावट निगेटिव्ह रिपोर्ट वाडिया रुग्णालयातून मिळविले. कहर म्हणजे दोन मृत पावलेल्या व्यक्तींचेही कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट येथील कर्मचाऱ्याने दिले. याशिवाय, चार हयात असलेल्या व्यक्तींचेही रिपोर्ट याच रुग्णालयातून मिळवले. त्यानंतर हा प्रकार गुन्हे अन्वेषण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. स्वॅब न घेताच हे रिपोर्ट दिले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशीमध्ये नेमकी यातील आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे स्पष्ट होईल, असेही तपास अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Cocoa's negative fake report racket exposed