बेरोजगारांनी नमविले कोकाकोलाला
By Admin | Updated: November 16, 2016 04:14 IST2016-11-16T04:14:49+5:302016-11-16T04:14:49+5:30
या तालुक्यातील कुडूस या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोका कोला या कंपनीत लागणारी वाहने यापुढे स्थानिकांची वापरली जातील, बाहेरच्यांची कंत्राटे रद्द केली

बेरोजगारांनी नमविले कोकाकोलाला
वाडा : या तालुक्यातील कुडूस या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोका कोला या कंपनीत लागणारी वाहने यापुढे स्थानिकांची वापरली जातील, बाहेरच्यांची कंत्राटे रद्द केली जातील हे आज कंपनीला मान्य करावे लागले. याबाबत कुडूस ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ. गिरीश चौधरी यांनी आवाज उठवून स्थानिकांना वाहतूक ठेका देण्याची मागणी केली. तरूणांनी कंपनीचे प्रवेशद्वार अडविताच प्रशासन खडबडून जागे झाले. व स्थानिकांना वाहतूक ठेका देण्याचे मान्य केले. या निर्णयाने बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
या कंपनीत शितपेयांचे उत्पादन केले जाते. त्याच्या कच्चा व पक्क्या मालाची वाहतूक करण्यासाठी दररोज सव्वाशे ते दीडशे टेम्पो व ट्रक लागतात. या वाहतूकीचा ठेका हा बाहेरील चौदा ठेकेदारांना देण्यात आला असून ते स्थानिक वाहने घेत नाहीत. परिणामी त्यांना रोजगार मिळत नाही.
स्थानिक बेरोजगार तरूणांची व्यथा स्वाभिमान संघटना वाहतूक सेनेचे वाडा तालुकाध्यक्ष रूकसाद शेख यांनी कुडूस ग्रामपंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश चौधरी यांना सांगितली. चौधरी यांनी लगेचच या बाबत कंपनीशी पत्रव्यवहार केला. स्थानिकांना वाहतूकीचा ठेका देण्याची मागणी केली. तिच्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले. त्यानंतर गिरीश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तरूणांनी गेल्या काही दिवसां पूर्वी कंपनीचे प्रवेशद्वार अडवून बाहेरील वाहने घेण्यास मज्जाव केल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून स्थानिक वाहने घेण्यास सुरुवात केली. डिसेंबरनंतर वाहतूक ठेका स्थानिकांना देऊ, असे आश्वासन दिले गेले. (प्रतिनिधी)