उल्हासनगरात जमावबंदी?

By Admin | Updated: March 31, 2016 02:54 IST2016-03-31T02:54:25+5:302016-03-31T02:54:25+5:30

अपुऱ्या, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आणि अनेक भागांतील तीव्र पाणीटंचाईमुळे उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलने, मारहाणीच्या घटना, ठिय्या, उपोषणे सुरू आहेत.

Coalition in Ulhasnagar? | उल्हासनगरात जमावबंदी?

उल्हासनगरात जमावबंदी?

उल्हासनगर : अपुऱ्या, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आणि अनेक भागांतील तीव्र पाणीटंचाईमुळे उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलने, मारहाणीच्या घटना, ठिय्या, उपोषणे सुरू आहेत. पाण्याच्या पळवापळवीच्या घटनाही घडत आहेत. परिस्थिती क्षणोक्षणी गंभीर बनत आहे. पोलीस बंदोबस्तात पालिका कर्मचारी सध्या काम करीत आहेत. ही स्फोटक परिस्थिती लक्षात घेऊन शहरात जमावबंदी लागू करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करीत असल्याचे संकेत आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले.
शहरातील उंचावरील जलकुंभांचा ताबा नगरसेवकांसह तथाकथित समाजसेवक आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तेथे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी आहे. मात्र, पाण्याच्या टाक्यांचाच ताबा घेतल्याने अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनते आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. वेगवेगळे उपाय करूनही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने समाजकंटकांचा उपद्रव वाढल्याने उल्हासनगरमध्येही जमावबंदी लागू करण्याच्या निष्कर्षाप्रत आयुक्त येऊन ठेपले आहेत. (प्रतिनिधी)

मनसेसोबत चर्चा
उल्हासनगरात जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत मनसेने शोले स्टाइल ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर, प्रभागातील नागरिकांसह पालिका अधिकारी उपोषणकर्त्यांशी गुरुवारी चर्चा करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

नगरसेवकांनी मागितले पोलीस संरक्षण
भाजपाचे नगरसेवक हरेश जग्यासी यांच्या घरावर प्रभागातील नागरिकांनी बुधवारी पाण्यासाठी मोर्चा काढला. मोर्चातील काहींनी त्यांना मारहाणीची धमकी दिल्याने जग्यासी आणि भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे.

खेमानी नाल्याचे काम सुरू
महापालिकेने ३२ कोटींच्या निधीतून खेमानी नाल्याचा प्रवाह वळवण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील सांडपाणी, रासायनिक पाणी वाहून नेणारा हा खेमानी नाला उल्हास नदीला थेट जाऊन मिळत असल्याने प्रदूषण वाढते आहे. त्यामुळे त्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पालिका काढते आहे जलपर्णी
उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ग्रामीण परिसर, भार्इंदर, भिवंडी आदी पालिकांना उल्हास नदीतून पाणीपुरवठा होत आहे.
नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सर्व पालिकांसह पाटबंधारे विभाग व एमआयडीसी यांचे आहे.
असे असताना फक्त उल्हासनगर पालिका लाखो रुपये खर्च करून जलपर्णी काढत असल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.

Web Title: Coalition in Ulhasnagar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.