मुख्यमंत्र्यांनी साधेपणाची चौकट स्पष्ट करावी, नियमावली नसल्यामुळे मंडळांमध्ये गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:56 IST2020-06-21T00:56:36+5:302020-06-21T00:56:41+5:30
समितीची सुचनावली तयार आहे, पण शासनाची नियमावली तयार नाही. ती लवकर जाहीर व्हावी. मूर्तींच्या उंचीबाबतही कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत.

मुख्यमंत्र्यांनी साधेपणाची चौकट स्पष्ट करावी, नियमावली नसल्यामुळे मंडळांमध्ये गोंधळ
ठाणे : मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, साधेपणाची चौकट स्पष्ट केलेली नाही. ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीने सुचनावली तयार केली असली तरी शासनाने नियमावली तयार केली नसल्याने गणेशोत्सव मंडळांमध्ये गोंधळ आहे. गणेशोत्सव हा काही दिवसांवर आला असल्यामुळे शासनाने नियमावली जाहीर करून समन्वय साधावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. साधेपणाने म्हणजे नेमका कसा हे स्पष्ट केले नसल्याचे समिती अध्यक्ष समीर सावंत यांचे म्हणणे आहे. सरकारला आमचे पूर्ण सहकार्य आहे. पण, प्रत्येक शहरात कोरोनाची परिस्थिती वेगळी आहे. त्या परिस्थितीनुसार उत्सवाचे नियम शहरातील मंडळांना विश्वासात घेऊन त्या-त्या महापालिकेने घालून द्यावे. समितीची सुचनावली तयार आहे, पण शासनाची नियमावली तयार नाही. ती लवकर जाहीर व्हावी. मूर्तींच्या उंचीबाबतही कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत.
>गणेशोत्सवात चिनी वस्तूंचा वापर नको!
सध्या भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात मंडळांनी चिनी वस्तूंचा वापर पूर्ण टाळावा, असे आवाहन ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व मंडळांना केले आहे. सजावटीसाठी लायटिंग, तोरण, रंग अशा अनेक वस्तू चिनी असतात. त्यामुळे यंदाच्या उत्सवात या वस्तू वापरू नयेत आणि स्वदेशी वस्तूंवर भर द्यावा, असेही या आवाहनात म्हटले आहे. सध्या समितीशी २५० गणेशोत्सव मंडळ जोडले आहेत. त्यांना सोशल मीडियाद्वारे आवाहन केले जात आहे. त्याला प्रतिसादही मिळत असल्याचे सावंत यांनी सांगितले.