मुरबाड तालुक्यातील बंद कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:43+5:302021-04-03T04:36:43+5:30
मुरबाड : कोरोनाची दुसरी लाट मुरबाड तालुक्यात आली असली, तरी बाधित रुग्णांना प्राथमिक उपचारांनंतर कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी बदलापूर, ...

मुरबाड तालुक्यातील बंद कोविड सेंटर सुरू
मुरबाड : कोरोनाची दुसरी लाट मुरबाड तालुक्यात आली असली, तरी बाधित रुग्णांना प्राथमिक उपचारांनंतर कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी बदलापूर, उल्हासनगर, ठाणे या ठिकाणी जावे लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली व तत्काळ मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये बंद असलेले कोविड सेंटर सुरू केले. येथे ५० बेडची सुविधा उपलब्ध केली आहे. याची गुरुवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, तहसीलदार अमोल कदम, मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी पाहणी केली.
जानेवारीपासून मुरबाडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील आठवड्यात धसई येथे आईमुलाचा कोरोनाने मृत्यू झाला. किरकोळ आजाराकरिता नागरिक खाजगी रुग्णालयात उपचार घेत असले, तरी ते महागडे आहेत. सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी बदलापूर, उल्हासनगर किंवा ठाणे येथे भटकंती करावी लागते. या भटकंतीमुळे अनेक बाधित रुग्ण हे आपला आजार अंगावर काढत असल्याने कोरोनाच्या संक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असे असूनही ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर तसेच प्रशिक्षित कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्यामुळे प्रशासन ते सुरू करण्यात जाणीवपूर्वक चालढकल करीत होते. ‘लोकमत’ने हे वास्तव समोर आणल्याने बंद असलेल्या कोविड सेंटरमध्ये जिल्हा प्रशासनाने गुरुवारी तत्काळ डाॅक्टर तसेच इतर कर्मचारी उपलब्ध करत ते सुरू केले. तेथे कोणकोणत्या सुविधा आहेत, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भेट दिली. तालुक्यातील म्हसा, धसई, शिवळे, सरळगाव, तुळई, शिरोशी, न्याहाडी, किशोर या प्राथमिक आरोग्य केंद्रांत तसेच टोकावडे व मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात कोविडची लस देण्यास सुरुवात केली आहे.
---------------------------------
मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील ट्राॅमा केअर सेंटरमध्ये कोविड सेंटर सुरू केले असून तेथे तीन डाॅक्टर, आठ परिचारिका, इतर सात कर्मचारी उपलब्ध केले असून त्याठिकाणी सहा रुग्ण उपचार घेत आहेत.
- डाॅ. संजय वाठोरे, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मुरबाडमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने कोविड सेंटर सुरू केले असले, तरी नागरिकांना बेफिकीर न राहता भविष्यात अत्यंत भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. म्हणून आपली व परिवाराची काळजी घेणे ही काळाची गरज आहे.
- डाॅ. श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी