लिपीक प्रश्नपत्रिका फुटली
By Admin | Updated: October 5, 2015 00:25 IST2015-10-05T00:25:10+5:302015-10-05T00:25:10+5:30
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक आणि टंकलेखकपद भरतीच्या १३४ जागांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेमध्ये आर्यन एज्युकेशन सोसायटी शाळेच्या

लिपीक प्रश्नपत्रिका फुटली
पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक आणि टंकलेखकपद भरतीच्या १३४ जागांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेमध्ये आर्यन एज्युकेशन सोसायटी शाळेच्या परीक्षा केंद्रातून मोबाइलद्वारे व्हॉट्सअॅपवरून प्रश्नपत्रिका तसेच उत्तरपत्रिकांची देवाणघेवाण करणाऱ्या दोन परीक्षार्थ्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही परीक्षार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात १३४ जागांसाठी रविवारी २४ हजार ९६७ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यांच्यासाठी पालघर व वसई तालुक्यातील ५७ उपकेंद्रांवर त्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यासह नांदेड, यवतमाळ, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे इ. भागांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले होते. या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळावी, यासाठी अनेक शासकीय अधिकारी, राजकीय लोक, दलाल यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर व त्यांच्या टीमने एका कार्यक्रमाची आखणी केली होती. ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये या प्रश्नपत्रिकेची छपाई करण्यात आली, त्या प्रेसचा ताबा शनिवारी रात्रीपासूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या टीमने घेतला होता.
प्रिंटिंग कामात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाइल ताब्यात घेण्यात आले होते. प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्यानंतर विश्वासू अधिकाऱ्यांच्या साहाय्याने पालघर व वसई तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात पोहोचविण्यात आल्या होत्या. या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व माहिती बाहेर पडू नये, यासाठी प्रश्नपत्रिका छपाई करणाऱ्या सर्व टीमला पेपर संपेपर्यंत कंपनीबाहेर पडू न देता त्यांचे मोबाइलही ताब्यात घेण्यात आले होते. ही सर्व प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात आल्याची माहितीही एका विश्वसनीय सूत्राने दिली.
रविवारी सकाळी १०.३० वा. सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. ११ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर आर्यन आणि भगिनी समाज शाळेमधील काही परीक्षार्थी १० ते १५ मिनिटे उशिराने आल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे कळते.
या वेळी परीक्षा केंद्रात मोबाइल नेण्यास मज्जाव असूनही आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या परीक्षा केंद्रात परीक्षा देणारे राजीव प्रकाश झडके, रा. उमरखेडा, जि. यवतमाळ व राजू हनोता अंबोरे, रा. माहूर, जि. नांदेड यांनी व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिका बाहेर पाठविल्याचे परीक्षा केंद्रप्रमुखाच्या लक्षात आले. त्यानंतर, या दोन्ही परीक्षार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहा. पो.नि. दीपक साळुंखे या तपास अधिकाऱ्यांमार्फत गुन्हे दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत करत होते. जिल्हाधिकारी व त्यांच्या टीमने परीक्षेमध्ये पारदर्शकता ठेवल्यामुळे योग्य उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी)