मीरा रोडमध्ये यात्रेतून स्वच्छतेचा संदेश
By Admin | Updated: March 29, 2017 05:20 IST2017-03-29T05:20:49+5:302017-03-29T05:20:49+5:30
काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यावतीने काढलेल्या स्वागतयात्रेला सिल्वर पार्क येथील साईबाबा

मीरा रोडमध्ये यात्रेतून स्वच्छतेचा संदेश
भार्इंदर/मीरा रोड : काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यावतीने काढलेल्या स्वागतयात्रेला सिल्वर पार्क येथील साईबाबा मंदिराजवळ गुढी उभारून सुरुवात झाली. सिल्वर पार्क व रामनगर येथून निघालेल्या यात्रा शांतीपार्क, जांगिड सर्कल, शांतीगार्डन, सृष्टी, पूनमसागर, शांतीविहार, शांतीनगर सेक्टर ३ मधील जैनमंदिर ते मीरा रोड रेल्वेस्थानक दरम्यान यात्रेत ठिकठिकाणी गुढी उभारण्यात आल्या. तसेच रांगोळ्या काढण्यात आल्या. शांतीनगर परिसरात मुस्लिमांनी यात्रेचे स्वागत केले. मीरा रोड रेल्वे स्थानक परिसरात सांगता झालेल्या यात्रेच्या ठिकाणी मुख्य रांगोळी स्पर्धा झाली. त्यात महिलांचे एकूण १२ गट सहभागी झाले होते. त्यातील तीन महिलांना हुसेन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात्रेत वारकरी दिंडी, ध्वजपथक, ढोलपथक, लेझीम पथक, चित्ररथ, दानपट्टा, मर्दानी खेळाचा समावेश करण्यात आला होता. रेल्वे स्थानक परिसरात यात्रेची सांगता झाल्यानंतर तेथे मराठी संगीताचा कार्यक्रम झाला. यात्रेत मुझफ्फर हुसेन, माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन यांच्यासह प्रदेश महासचिव राजेश शर्मा, सचिव मेहुल व्होरा, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक जुबेर इनामदार, प्रमोद सामंत, अश्रफ शेख, नगरसेविका कांचना पुजारा, मर्लिनन डिसा सहभागी झाले होते.
मीरा रोडमध्ये नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने काढलेल्या यात्रेत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यात्रेला शाश्वत गृहसंकुल येथून सुरूवात झाली. सिल्वर पार्क येथील साईबाबा मंदिराजवळ सांगता झाली. यात २५ सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. संत गाडगेबाबा महराज, भारतमाता रथ विशेष आकर्षण ठरले. आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन, समितीचे गजानन नागे, अजित साळुंखे, मिलिंद देव, संजय पवार, मयूर जाधव सहभागी झाले होते.
दरम्यान, काशिमीरामधील पांडुरंगवाडी आणि घोडबंदर गावातही पालखी व शोभायात्रा काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत महिला सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)