स्वच्छता मोहिमेची धुरा अभियंत्यांवर
By Admin | Updated: November 12, 2016 06:25 IST2016-11-12T06:25:23+5:302016-11-12T06:25:23+5:30
‘स्वच्छ भारत अभियाना’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभियंत्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे.

स्वच्छता मोहिमेची धुरा अभियंत्यांवर
कल्याण : ‘स्वच्छ भारत अभियाना’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभियंत्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. आरोग्य निरीक्षक आणि अधीक्षकांचीही तेवढीच जबाबदारी असणार आहे. प्रत्येकी दोन प्रभागांची धुरा सोपवण्यात आली असून त्यांच्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांचा वॉच राहणार आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ आॅक्टोबर २०१४ पासून ‘स्वच्छ भारत अभियान’ केडीएमसीच्या वतीने राबवण्यात येत आहे. परंतु, याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी जबाबदारी दिलेल्या प्रभागात कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त आठवड्यातून किमान २ दिवस वेळ काढून अभियानाची कार्यवाही करावयाची आहे. प्रभागातील सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी व समाजसेवक यांच्या सहकार्याने सार्वजनिक स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, प्रभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत नियमित बैठका घेऊन सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे व श्रमदान मोहीम राबवणे, प्रभागक्षेत्र अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांच्याशी समन्वय साधून प्रभागातील स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेणे, उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करण्यासाठी गुडमॉर्निंग कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दर बुधवारी सकाळी ५ ते ८ यावेळेत १० प्रभाग क्षेत्रांत सुरू केले आहेत. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होते की नाही, याची खातरजमा करून अहवाल सादर करणे, याचबरोबर पालिकेतर्फे राबवण्यात येणारे विविध प्रकल्प, उपक्रम व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात समन्वयक म्हणून काम पाहणे आदी कामांची जबाबदारी उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि अधीक्षकांवर देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)